Pune : चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं – आमदार रोहित पवार

Chandrakant Patil did not join Shiv Sena, I.e. done - MLA Rohit Pawar : शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतरही केवळ सत्तेत जाण्यासाठी भाजपला घाई झाली आहे.

एमपीसी न्यूज – शिवसेना – भाजप युती तुटल्यानंतरही केवळ सत्तेत जाण्यासाठी भाजपला घाई झाली आहे. आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचे भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची घाई बघता 5 वर्षांत भाजपपासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या, असे म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

बुधवारी यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. कोरोनाच्या संकट काळात आता तरी राजकारण थांबवा, असे आवाहन त्यांनी या ट्विटमध्ये केले आहे. तर, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा शिवसेनेनेही खरपूस समाचार घेतला आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट पाहता आजही राज्याच्या हितासाठी शिवसेनेत जाण्यास तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. एकत्र आलो तरी त्यांच्यासोबत निवडणुका लढवणार नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले होते.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र येण्याचा फॉर्म्युला ठरवेल. तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंजूर झाल्यास आम्ही शिवसेनेसोबत जाऊ, असेही पाटील म्हणाले होते.

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजप युती होती. त्यानंतर या दोन्ही पक्षात मुख्यमंत्री पदावरून बिनसले होते.

त्यानंतर शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जबाबदारी पार पाडत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.