Pune : ‘कोरोना’बाबत घाबरून न जाता नागरिकांनी सतर्कता बाळगावी -गिरीश बापट

एमपीसी न्यूज – जगभर पसरलेल्या ‘कोरोना’ विषाणूने भारतात प्रवेश केला असून पुण्यातही कोरोना या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण  आढळून आल्यानंतर प्रशासनाच्या संपर्कात असून वेळोवेळी प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेत असल्याचे खासदार बापट यांनी म्हटले आहे.

बाधित रुग्णांना नायडू हॉस्पिटल, पुणे येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय महापालिकेकडून आणखी दोन विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहेत.

कोरोना विषाणू  इतर विषाणूंच्या तुलनेत झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. हा आजार योग्य खबरदारी व वेळीच उपचार केल्यामुळे बरा होवू शकतो.

जगभरात या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सांगितलेल्या उपाय योजनांचा अवलंब करावा. कोरोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मिडियावर पाठवू नयेत. सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जात असून सर्वांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.

शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे खोकतांना, शिंकताना नाका- तोंडावर रुमाल ठेवावा, हात वारंवार धुवावा,  शिंकताना, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये, फळे, भाज्या धुवूनच खावेत, असे आवाहन खासदार बापट यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.