Pune Corona News : गरिब-गरजू, वंचित घटकांना ‘वंचित विकास’चा मदतीचा हात

एमपीसीन्यूज : गेल्या दीड वर्षात कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले आहे. या कठीण काळात सर्वाधिक झळ आर्थिक, सामाजिक उतरंडीच्या तळाच्या स्तरावर असलेल्या लोकांना बसली आहे. अशा गरीब, गरजू व वंचित घटकांतील लोकांना मदतीचा हात देऊन त्यांना उभे करण्याचा प्रयत्न वंचित विकास संस्था गेले वर्षभर सातत्याने करीत आहे. पहिल्या लाटेप्रमाणेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही वंचित विकास संस्थेचे काम अव्याहतपणे सुरु आहे, असे संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर व सुनीता जोगळेकर यांनी सांगितले.

पुण्यातील लालबत्ती विभागात रोज 300 लोकांना जेवण, तसेच गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण, ससून रुग्णालयातील रुग्ण व आवारातील गरजूंना जेवण, समाजातील गरजू घटकांना महिन्याचा किराणा माल व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे.

एकल महिला, अंध, अपंग, रुग्ण, कोरोनामुळे नोकरी गमावलेल्याना दारिद्र्यरेषेखालील लोकांना महिनाभराचे धान्य व किराणा देण्यात आला आहे. यासह नितीन करंदीकर यांच्या सहकार्यातून कोरोनाबाबत जनजागृती आणि आपत्कालीन सेवेसाठी समाजाला रिक्षा उपलब्ध करून देण्यात येत आहे. संस्थेला पुष्पा हेगडे, पारिजात फौंडेशन, डॉ. नारायण देसाई, ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्राम, पुणे यांनी मदत केली

‘लालबत्ती’मधील 180  जणांचे लसीकरण

वंचित विकास संस्था शरीर विक्रय करणाऱ्या महिलांसाठी गेली ३० वर्षे काम करीत आहे. या स्त्रियांच्या मनात लसीकरणाबद्दल खूप भीती व गैरसमज होते. ते दूर करून वय वर्ष ४५ च्या पुढील शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्याशी संबंधित पुरुष, तृतीयपंथी अशा १८० जणांचे बुधवार पेठेतील वंचित विकास संस्थेच्या दवाखान्यात लसीकरण करण्यात आले.

यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल आगरवाल, त्यांचे सचिव आशिष अगरवाल, संस्थेचे हितचिंतक पराग ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे कुर्लेकर म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.