Pune Corona Update: एका दिवसांत सर्वाधिक 877 नवे रुग्ण, 589 रुग्णांना डिस्चार्ज, 19 जणांचा मृत्यू

एकूण कोरोनाबाधित 18 हजार 105 पैकी 61 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर 3.66 टक्क्यांपर्यंत कमी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसांतील नवीन रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

पुणे शहरात एकाच दिवसात 4 हजार 068 स्वॅब टेस्ट नोंदवल्या गेल्या आहेत. आजवरची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारीपैकी आहे. पुणे शहराची एकूण स्वॅब टेस्ट संख्या आता 1 लाख 20 हजार 058 इतकी झाली आहे.  शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 18 हजार 105 पर्यंत जाऊन पोहचली आहे.

आता अर्ध्या तासात रिपोर्ट देणाऱ्या कोरोना चाचण्या सुरू झाल्याने आता रुग्णसंख्या आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरातील 11,040 रुग्णांची कोरोनावर मात!

कोरोनाचे 589 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 11 हजार 40 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 60.98 म्हणजेच जवळजवळ 61 टक्के आहे.

पुण्यात आजअखेर एकूण 6 हजार 403 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 347 रुग्ण क्रिटिकल असून त्यात 55 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 35.37 टक्के आहे.

शहरातील मृत्यूदर 3.66 टक्क्यांपर्यंत खाली 

बुधवारी शहरात 19 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. शहरातील कोरोना बळींचा आकडा 662 पर्यंत वाढला आहे. शहरातील मृत्यूदर 3.66 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळत आहे.

राहटणीतील 56 वर्षीय पुरुषाचा रत्ना मेमरी हॉस्पिटलमध्ये, दत्तवाडीतील 82 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 70 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, शिर्के कंपनी जवळील 44 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, वडगावशेरीमधील 68 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, नवी पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, मुंढव्यातील 68 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 85 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 70 वर्षीय पुरुषाचा सासून हॉस्पिटलमध्ये, मुंढव्यातील 64 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, दत्तवाडीतील 78 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 75 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 66 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, मॉडेल कॉलनीतील 77 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 40 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, वडगाव बुद्रुकमधील 70 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 59 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.