Pune Crime news : कारागृहात असलेल्या गुंडाने घेतली नगरसेवकाच्या हत्येची सुपारी, पण एक फोन आला अन्…

एमपीसी न्यूज – कारागृहात असलेल्या एका सराईत गुंडाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या हत्येची सुपारी घेतली. नगरसेवकाचा खून करण्यासाठी आपली काही माणसेही त्याच्या घराजवळ पाठवली. परंतु या नगरसेवकाच्या मुलाच्या मोबाईलवर एक फोन आला आणि त्यांना या संपुर्ण कटाची माहिती समजली. 

दारावर आलेल्या गुंडांना नगरसेवकाच्या पत्नीने हटकले आणि त्यांनी पळ काढला.. त्यानंतर या नगरसेवकांनी चतु:शृंगी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

बाणेर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार सध्या येरवडा कारागृहात असलेला गुंड यशवंते, त्याचे साथीदार आणि सुपारी देणारा अज्ञात व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांच्या मुलाला एका व्यक्तीने फोन करुन वडीलांवर खुनी हल्ला करण्यासाठी काही व्यक्ती बाहेर परिसरात आले असल्याची माहिती दिली. तसेच कारागृहात असलेला गुंड यशवंते याने ही माणसे पाठवल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी फिर्यादी यांच्या पत्नी घराचे गेट लावत असताना त्यांच्या गेट समोर एक कार उभी राहिली. त्यात दोघेजण बसलेले होते. फिर्यादी यांनी कोण पाहिजे असे विचारले असता त्यांनी गडबडीत कार रिव्हर्स घेत तेथून निघून गेले. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी तात्काळ चतुःशृंगी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.