Pune Crime News : ‘त्या’ गोळीबार प्रकरणातील आरोपी दत्तवाडी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनीनगर भागात गोळीबार करणाऱ्या आरोपीला त्याच्या साथीदारांसह दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

अजय भागवत घाडगे (वय 21 वर्ष) गणेश कवीश पवार (वय 21 वर्ष ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे व अमित सुर्वे दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या  हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक व्यक्ती पिस्टल घेऊन दांडेकर पूल परिसरात थांबला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून या ठिकाणाहून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पिस्टल आणि जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी गणेश पवार हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात जाळपोळ, मारामाऱ्या, तोडफोड, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सिद्धिकी शेख त्याच्यावर गोळीबार केला होता. तसेच कोयत्याने मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली होती. तसेच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एका दुचाकीस्वाराला अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याजवळील चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

दुसरा आरोपी अजय घाडगे याला पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून आणि जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. या दोन्ही आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पकडले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.