Pune Crime News: हडपसर येथे आठ लाखाचा गांजा जप्त, एकाला अटक

एमपीसीन्यूज : अमली पदार्थविरोधी पथकाने पुणे -सासवड रस्त्यावरून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली. त्याच्या ताब्यातून 8 लाख रुपये किमतीचा 40 किलो 511 ग्रॅम गांजा जप्त केला. आज, शनिवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

सचिन नरसिंग शिंदे (वय 33) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार मनोज साळुंखे यांना खबऱ्याकडून हडपसर परिसरात एका वॅगनार कारमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला.

त्यानुसार आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील सातववाडी बस स्टॉप समोर आलेल्या वॅगनार कारची तपासणी केली असता या कारमध्ये त्यांना 40 किलो 511 ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी या गांजासहित वॅगनार कार, रोख 40 हजार रुपये, एक मोबाईल फोन, असा एकूण 13 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने हा गांजा रामलिंग रोड शिरूर येथून एका महिलेकडून विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस कर्मचारी प्रवीण शिर्के, राहुल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, नितीन जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.