Pune Crime News : रेमडिसिवीरची विक्री तब्बल 18 हजाराला, पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज – शहरात एकीकडे रेमडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा असताना दुसरीकडे मात्र या इंजेक्शनचा काळाबाजार मात्र सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे. तब्बल 18 हजार रुपये किमतीला रेमडिसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांच्या ताब्यातून 4 इंजेक्शन जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोहंमद महिरुख पठाण (वय 28), परवेज मैनुद्दीन शेख (वय 36), इम्तियाज युसूफ अजमेरी (वय 52), अश्विन विजय सोळखी (वय 41) यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात आणि रोहिदास बनाजी गोरे (वय 47) याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आऊन एफडीएच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरात सध्या मोठ्या प्रमाणात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. चार चार दिवस शोधाशोध करूनही रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळत नाही. दुसरीकडे याचा काळाबाजार मात्र सुरूच आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी 10 वेगवेगळी पथके तयार केली आहेत.

दरम्यान चंदननगर आणि वाघोली परिसरात या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना अटक केली. पुणे नगर रस्त्यावर पठाण, शेख, अजमेरी आणि सोलकी या चौघांना पोलिसांनी 18 हजार रुपये किमतीत इंजेक्शन विक्री करत असताना पकडले आहे. ते औषध विक्रेते असल्याचे सांगत होते. तर, गोरे याला केसनंद फाटा परिसरात पकडले आहे. त्याच्याकडून देखील 2 इंजेक्शन जप्त केले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या काळा बाजार प्रकरणात स्वतः लक्ष घालत त्याला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे काही प्रमाणात याला लगाम लावला जात असल्याचे दिसत आहे. पुणे पोलिसांची ही तिसरी मोठी कारवाई झाली आहे. नागरिकांनी देखील असे काही संशयास्पद दिसून आल्यास पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.