Pune Crime News : अटकेत असलेल्या निलंबित पोलीस शिपायाला मदत करणे भोवले, सहायक पोलीस निरीक्षक निलंबित

एमपीसीन्यूज : अटकेत असलेल्या निलंबित पोलीस शिपायाला मदत करणाऱ्या बंडगार्डन पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.

नीलेश सुरेश घोरपडे असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश जगताप हा एका गुन्ह्यात अटक आहे. 11 ऑक्टोबरला ससून रुग्णालयात तो उपोषण करीत होता. त्यावेळी पुणे स्टेशन पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश घोरपडे आणि त्यांच्या टीमला ससून रुग्णालयात जाऊन जगतापचे समुपदेशन करण्यास सांगण्यात आले होते.

त्यानुसार घोरपडे ससून रुग्णालयात गेले असता, शैलेश जगतापने त्यांना रास्ता पेठेतील जागेचा ताबा घेण्यासाठी मोक्काचा गुन्हा दाखल करुन दबाव आणला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे उपोषण करीत असल्याचे जगतापने घोरपडे यांना सांगितले.

मात्र, कर्तव्यावर असतानाही घोरपडे यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणली नाही. त्याची अनावश्यकरित्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्याचा रिपोर्ट दिला. त्याशिवाय संबंधित रिपोर्ट ब-याच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाला.

त्यामुळे शासकीय गोपनियता भंग झाल्याचा आणि पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका घोरपडे यांच्यावर ठेवण्यात आला. त्याशिवाय आरोपीला मदत केल्याचा ठपका ठेउन त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.