Pune : किल्ले राजगडावर अवतरली शिवशाही ! दुर्गराज राजगडवर दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज- दुर्गराज राजगडवर दीपोत्सव साजरा करून पुन्हा एकदा शिवशाहीच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. भटकंती.. गड दुर्गांची मित्र परिवार, सरहद परिवार, गडझुंजार मावळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

फुलांनी केलेली सजावट आणि दिव्यांच्या प्रकाशात राजगडाचा परिसर आणि आसमंत उजळून निघाला. पद्मावती मंदिराचा गाभारा, सभामंडप, ओसरी, मंदिराच्या बाहेर रांगोळी, दीपस्तंभ, पाली दरवाजा यावर तोरण लावून बाकी सर्व फुलांनी सजवण्यात आले होते. या वर्षीच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे चंद्रकांत मांगडे यांच्या पुढाकाराने गडावर गोंधळी नेऊन आई पद्मावती देवी मंदिरात संबळ वाजवून प्रथमच देवीचा जागर झाला.

शिवभक्तांनी हातात मशाल घेऊन नाचण्याचा आनंद साजरा केला. शिवव्याख्याते राहुल नलावडे यांनी त्यांच्या सुमधुर वाणीने कविभूषण यांच्या छंदातून महाराजांचा अनोखा इतिहास सादर केला. पहाटे पाच वाजता सर्वजण पद्मावती मंदिरात जमले. महाराजांची मूर्ती पालखीत ठेऊन पुढे मशाली व मागे पालखी व त्या मागे सर्व मावळे व रणरागिणी यांनी पारंपरिक वेशभूषेत पालखी सोहळ्यात उपस्थिती लावली. पाली दरवाजा येथे मान्यवरांच्या हस्ते दीप लावण्यात आले. त्यानंतर पालखी पुन्हा पद्मावती मंदिरात आणण्यात आली.

आरती झाल्यानंतर मयूर दादा मसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तानाजी जगताप, सचिन कोळी, चंद्रकांत मांगडे व शैलेश गायकवाड यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोहळ्यासाठी घाटवाटा लेखक सुशील दुधाने , गडकिल्ले अभ्यासक दर्शन वाघ, प्रशांत साळुंखे, राजाभाऊ फरांदे, राजेंद्र धुमाळ व दानवले पाटील उपस्थित होते. सालाबादप्रमाणे ही मोहीम राहुलदादा नलावडे व मयूर दादा मसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.

राजगड दीपोत्सव सोहळा का?

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी शिवाजी महाराजांनी सुलतानी आक्रमकांची सत्ता झुगारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व ती सोनेरी पहाट ज्या दुर्गाने अनुभवली,प्रत्येक मावळ्याला त्याच्या अंगातील शौर्याचा जिथे साक्षात्कार झाला,तळपत्या समशेरीतून अनेक वीरांच्या गाथा जेथे अजरामर झाल्या,ज्या दुर्गावर शम्भू राजे बागडले ,घडले ती ही पवित्र भूमी आई जिजाऊंच्या संस्कारांनी पावन झाली व पिचलेला समाज, मनाने पराभूत समाज, लाचारी पत्करून जगणारा समाज पेटून उठला व हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवबा राजेंच्या मागे उभा राहिला .लंगोटी लावून हिंडणारी पोर पुढं जाऊन सरदार, सरनोबत, सरसेनापती या नावाने ओळखू जाऊ लागली..

आणि शिवबा, शिवाजी राजे ,शिवराय व शिवाजी महाराज हा महाराजांचा आयुष्याचा प्रवास ज्या दुर्गाने अनुभवला व त्यांना आई पद्मावती देवीने भरभरून अशीर्वाद दिले. आज त्याचे स्मरण करून दीपावलीच्या मंगल प्रसंगी आपल्या राजाची,वीरांची व त्या आई पद्मावती देवीचे स्मरण करून दीपावलीचा (वसुबारस) पहिला दिवा यांच्या चरणी अर्पण करून आपली निष्ठा जागृत ठेवली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.