Pune Doctor Suicide News: इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन डॉक्टर महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टर महिलेने इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली.

मनीषा रमेश कदम (वय 45) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी या महिलेचा पती रमेश नारायण कदम याच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनीषा या स्त्रीरोगतज्ज्ञ आहे तर त्यांचे पती देखील डॉक्टर आहेत. सातारा जिल्ह्यातील मेढ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. रमेश नेहमी मनीषा यांना दारूच्या नशेत मारहाण करत असे. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांना शिवीगाळही करत असे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी मनीषा यांना माहेरी नेऊन सोडले आणि पुन्हा परत आणले नाही. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून त्या माहेरीच वास्तव्यास होत्या.

काही दिवसापूर्वी त्यांची सासरच्या मंडळ सोबत एक बैठकही झाली होती. त्यावेळी पतीने त्यांना सासरी नेण्यास नकार दिला होता. त्यांची मोठी मुलगी पतीसोबत राहत होती तर लहान त्यांच्यासोबत राहत असे. पतीसोबतच्या भांडणामुळे त्यांना मोठ्या मुलीला भेटताही येत नव्हते. यामुळे मागील काही दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या.
सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मनीषा यांनी 27 नोव्हेंबर रोजी वारजे माळवाडी परिसरातील घरात भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस एस कथले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.