Pune : हडपसरवासियांचा खासदारांच्या संपर्काचा उपवास सुटला; डॉ. कोल्हे यांचा आढळरावांना टोला

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हडसपर विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाचे आज (शुक्रवारी)उद्‌घाटन करण्यात आले. आज आषाढीचा उपास असला. तरी, खासदारांचा संपर्काचा उपवास मात्र सुटल्याचे सांगत डॉ. कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना नाव न घेता टोला लगाविला.

यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे-पाटील, पुणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शिरुरचे माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, नगरसेवक योगेश ससाणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, “नागरिकांच्या अडी-अडचणींसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क कार्यालय सुरु करण्याचे आश्वासन प्रचारादरम्यान दिले होते. ते आश्वासन आज पूर्ण केले असून जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. मी जनतेसाठी नेहमीच उपलब्ध राहणार आहे. या जनसंपर्क कार्यालयाचे दरवाजे सर्वांसाठी कायम उघडे राहतील. नागरिकांच्या समस्या, अडी-अडचणी, विविध प्रश्नांसाठी कार्यालय नेहमीच खुले राहील.

यापूर्वीच्या खासदारांनी दहा वर्ष प्रतिनिधित्व करुनही हडसपर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क कार्यालय केले नव्हते. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नव्हत्या. आज आषाढीचा उपवास असला. तरी, खासदारांच्या संपर्काचा हडपसरवासियांचा उपवास मात्र सुटल्याचे सांगत डॉ. कोल्हे यांनी माजी खासदारांना टोला लगाविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.