Pune : पुणे, देहूरोड, खडकी कॅन्टोन्मेंट परिसरात कोरोनाचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करा : जिल्‍हाधिकारी

एमपीसी न्यूज : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी छावणी मंडळाने प्रयत्‍न करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर व इतर अधिकारी उपस्थित होते. खडकी, पुणे आणि देहूरोड छावणी परिसरात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात यावे, संशयित कोरोना विषयक रूग्णांना उपचारासाठी दाखल करणे, आवश्यकतेनुसार मास्क वितरण, स्वच्छता मोहीम आदीबाबत सूचना देण्यात आल्या.

देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) रुग्‍णालयांच्‍या उपलब्‍ध साधनसामुग्रीचाही जिल्‍हाधिकारी राम यांनी आढावा घेतला. खडकी छावणीतील रुग्‍णालयाला आवश्‍यक साधन सामुग्रीसाठी आवश्‍यकतेनुसार निधी उपलब्‍ध करुन दिला जाईल, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले.

या तीनही छावणी मंडळाच्‍या दवाखान्‍यात आयसीयू बेड वाढविण्‍यात यावेत, आवश्‍यकतेनुसार पीपीई कीट्स उपलब्‍ध करुन घेण्‍यात यावेत, घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्‍यविषयक सर्वेक्षण करण्‍यात यावे, असेही त्‍यांनी सांगितले.

डॉक्‍टरांनी आवश्‍यक ती खबरदारी घेवून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. तथापि, जे डॉक्टर रुग्‍ण तपासणीस नकार देतील त्‍यांच्‍यावर आपत्‍ती नियंत्रण कायदा तसेच इतर कायद्यांतर्गत नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्‍यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.