Pune : तिकीट वाटपापूर्वीच मावळ लोकसभा उमेदवारीसाठी भाजपा आक्रमक

बाळा भेगडे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संभाव्य उमेदवार खासदार श्रीरंग बारणे (Maval) यांच्या ऐवजी भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी, म्हणून मावळ तालुका भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारणेंच्या कार्यपध्दतीवर कडाडून टीका करत लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व असून हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी देण्यासाठीच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

शनिवारी सकाळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी (Maval) आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या ऐवजी बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी, म्हणून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भेगडे यांच्या निवासस्थानी सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीत मावळ भाजपा विधानसभा मतदार संघाचे विस्तारक रवी देशपांडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, शहराध्यक्ष अशोक दाभाडे, निवडणूक प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नितीन मराठे, गुलाबराव म्हाळस्कर शांताराम कदम, दत्तात्रय माळी, बाळासाहेब घोटकुले, उत्तर भारतीय भाजपा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंशू कुमार प्रेम (पाठक), लहु शेलार आदिंची भाषणे झाली. अब की बार 400 पार करायचे असेल तर बाळा भेगडे यांनांच उमेदवारी देण्याची जोरदार मागणी प्रत्येक वक्त्याने केली.

Talegaon Dabhade : मावळ नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे

या निवडणुकीत बारणे निवडून येण्याची शक्यता नाही, त्यांची सहाही विधानसभा मतदारसंघांवर पकड नाही, नागरिकांमधूनही त्यांच्या पराभवाचीच चर्चा होत आहे, भाजपाचे प्राबल्य मावळ लोकसभा मतदार संघावर आहे, बाळा भेगडे यांची प्रतिमा सहाही मतदार संघात पहिल्या पसंतीची आहे अशी कारणे देत वक्त्यांनी त्यांचा रोष व्यक्त केला. बारणे यांना उमेदवारी दिल्यास, भाजपाचा एकही कार्यकर्ता त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडणार नाही, भाजपा विक्रमी संख्येने नोटा मतदान करील, शहराध्यक्ष दाभाडे यांनी राजीनामा देण्याचा निर्धारही व्यक्त केला.


शहराध्यक्ष दाभाडे आणि खासदार बारणे यांच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका केली. एका वृत्तपत्राने नुकत्याच छापलेल्या ‘संसंदरत्न श्रीरंग आप्पा’ या पुस्तिकेत बाळा भेगडे आणि जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नावाचा साधा उल्लेखही नसल्याबद्दलचा नितीन मराठे यांनी खंत व्यक्त केली. बारणेंना दोनदा खासदारकीची उमेदवारी मिळवून देण्यात आणि विजयी करण्यात भाजपाने दिलेल्या योगदानाच्या युतीच्या धर्माचा विसर श्रीरंग बारणेंना पडला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. युतीचा धर्म मावळ मतदार संघात चालणार नसल्याचे स्पष्ट मत मराठे यांनी मांडले.

 

. बहुतांश वक्त्यांनी खा. बारणे यांच्या कार्यपध्दतीवर टीका करताना त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात न घेता काम केल्याचा आरोप केला.
मावळ विधानसभा मतदार संघाचे विस्तारक रवी देशपांडे म्हणाले, की पुण्यातील बैठकीत, रघुनाथ कुलकर्णी, मकरंद देशपांडे, रवी अनासपुरे यांनी माझ्यावर सोपविलेल्या मावळच्या विस्तारकपदाची जबाबदारी 11 जानेवारीला मी स्वीकारल्यानंतर, त्यानुसार मावळमधील एकंदरीत परिस्थितीची माहिती घेतली.
बाळाभाऊ भेगडे यांच्याशीही बोललो. संघटन मजबूत करण्याची जबाबदारी असल्याने गाव, घर भेटी घेतल्या. 12 फेब्रुवारीला माझा निरीक्षण अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. 12 फेब्रुवारीला माझा अहवाल वरपर्यंत पाठविला आहे.

तसेच प्रदेशासह लोकसभेच्या केंद्रीय विस्तारक समितीचे प्रमुख संयोजक कृपाशंकर सिंह यांना प्रत्यक्ष भेटून दिला आहे. त्यात मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांच्या भावनांचा समावेश आहे. एवढेच नाही, तर या अहवालात मावळ लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना हा मतदार संघ भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी देण्याबाबत मी उल्लेख केला आहे.

दरम्यान, माजीमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारीबाबत त्यांची प्रतिक्रीया विचारली असता, ते म्हणाले, की कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यामुळेच उमेदवार निवडून येऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि युतीच्यासाठी जिंकणे महत्वाचे आहे.

चलो मुंबईचा नारा…. शिष्टमंडळ रवाना
पक्षाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रमुख पदाधिका-यांचे शिष्टमंडळ आणि बाळा भेगडे यांच्या उमेदवारीची मागणी करण्यासाठी आज मुंबईला जाणार असल्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यांच्यासोबत विस्तारक रवी देशपांडे यांनीही येण्याची गळ पदाधिका-यांनी घातली. त्यांच्यामार्फत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शिष्टमंडळ मावळ लोकसभेसाठी बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्यासाठी गळ घालणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.