Pune : फूल विक्रेत्याला केले ‘फूल’ ; ‘गुगल पे’द्वारे 10 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज- ‘गुगल पे’द्वारे पैसे घेऊन एका भामट्याने एका फुल विक्रेत्याला ‘फूल’ केल्याचा प्रकार फर्ग्युसन रस्त्यावर घडला. मुलाच्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ हवेत असे सांगून या व्यावसायिकाला 10 हजार रुपयाला गंडा घातला.

या प्रकरणी एका फुलविक्रेत्याने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अशोक कुमार असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, या फुलविक्रेत्याचे यांचे फर्ग्युसन रस्त्यावर फुलांचे दुकान आहे. गुरुवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास फुलविक्रेत्याला अशोक कुमार नाव सांगणाऱ्या इसमाचा फोन आला. ‘माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. त्यामुळे मला 40 पुष्पगुच्छ पाहिजेत. किती पैसे होतील ?’ असे त्या व्यक्तीने विचारले. त्यावर ’16 हजार रुपये होतील,’ असे या बावळेकर सांगितले.

‘आता काही पैसे अॅडव्हान्स देतो आणि उद्या माझा माणूस पुष्पगुच्छ घेण्यास येईल. त्या वेळी ‌तो बाकीचे पैसे देईल’ असे या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर ‘तुमच्याकडे गुगल पे आहे का, असेल तर त्यावरच अॅडव्हान्स पैसे पाठवितो,’ अशी विचारणा त्याने केली. फुलविक्रेत्याने नुकतेच ‘गुगल पे’ खाते सुरू केल्यामुळे त्यांनी याच नंबरवर अॅडव्हान्स पाठवा, असे त्याला सांगितले.

काही वेळाने या व्यक्तीने पुन्हा या फुलविक्रेत्याला फोन करून तुमचा नंबर ‘गुगल पे’वर दिसत नसल्याचे सांगत तुमच्या मोबाइलवरून मला पाच रुपये पाठवा, म्हणजे मी तुम्हाला पैसे पाठवितो. त्यानुसार व्यावसायिकाने आपल्या खात्यावरून पाच रुपये पाठविले आणि या व्यक्तीनेदेखील त्वरित पुन्हा पाच रुपये पाठवून त्यांचा विश्‍वास संपादन केला.

त्यानंतर नेटवर्क नाही आणि माझे खाते मर्चंट असल्यामुळे पैसे येण्यास उशीर होत आहे, असे सांगून ‘तुम्ही मला दहा हजार रुपये पाठवा, मला येतात का ते पाहतो’ असे सांगितले. फुलविक्रेत्याने देखील 10 हजार रुपये पाठवले. पण पैसे देऊन अर्धा तास झाला तरीही दिलेले पैसे परत न आल्याने संबंधित फुलविक्रेत्याने त्या व्यक्तीला फोन केला असता, फोन बंद ठेवला असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.