Pune : वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन-लोककला सेवा पुरस्कारांची घोषणा

ह.भ.प. अमृताश्रम स्वामी महाराज, आचार्य हेमंतराजे मावळे यांचा 7 एप्रिल रोजी होणार गौरव

एमपीसी न्यूज -संत विचार प्रबोधिनी आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे (Pune)दिल्या जाणाऱ्या ‌‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2024′ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 

‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2024, कीर्तनसेवा पुरस्कार’ ह. भ. प. अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांना तर ‌‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कर 2024, लोककला सेवा पुरस्कार’ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य हेमंतराजे मावळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला संस्कृतीचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष असून 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

वै. डॉ. रामचंद्र देखणे यांचे साहित्य, लोककला, वारकरी संप्रदाय या(Pune) क्षेत्रांमधील योगदान लक्षात घेऊन तसेच त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षीपासून कीर्तन आणि लोककलेतील महनीय व्यक्तींचा सन्मान करण्यात येत आहे.

यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

आळंदी देवाची येथील वेदांत सत्संग समितीचे गुरुवर्य डॉ. श्री. नारायण महाराज जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजननाथ, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गुरुवर्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांचे कार्यक्रमास शुभाशीर्वाद लाभणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायक व अभिनेते अवधूत गांधी व सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या सांप्रदायिक पंचपदीने तसेच अक्षता इनामदार यांच्या पोवाडा गायनाने होणार आहे.

Pune : कोयत्याचे वार, 2 तरुण रक्तबंबाळ! पुण्यात भर दिवसा थरार

 

वै. डॉ. रामचंद्र देखणे हे साहित्यिक, संत व लोकवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक तसेच कीर्तनकार, व्याख्याते, प्रवचनकार आणि बहुरूपी भारूडकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी संतसाहित्य, लोकसाहित्य, ललित, संशोधनात्मक व चिंतनात्मक अशी 52 पुस्तके लिहिली.

मराठीतील सर्वच प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकांमध्ये तीन हजाराहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्र तसेच अमेरिका, दुबई येथील विविध व्याख्यानमालांमधून त्यांनी 3500हून अधिक व्याख्याने दिली. एकूण 16 साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. संत एकनाथ महाराजांच्या पारंपरिक भारूडांवर आधारित ‌‘बहुरूपी भारूड’ या कार्यक्रमांचे 2100हून अधिक प्रयोग केले.

डॉ. देखणे हे निष्णात वारकरी होते. ‌‘संत विचार प्रबोधिनी’ दिंडी घेऊन अनेक वर्षे त्यांनी पंढरपूरची वारी केली. साहित्य क्षेत्रातील व वारकरी सांप्रदायातील त्यांच्या योगदानाप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात येणार आहेत, असे डॉ. भावार्थ देखणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.