Pune : प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केले रिक्षात विसरलेले पाच लाख रुपये

एमपीसी न्यूज- रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशाकडून विसरलेले पाच लाख रुपये रिक्षाचालकाने संबंधित प्रवाशाला परत केले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल या रिक्षाचालकांचा कोंढवा पोलिसांनी विशेष सत्कार केला. मारुती दगडू वाघमारे असे या प्रामाणिक रिक्षाचालकाने नाव आहे.

प्रकाश मोतीराम कारमचंदानी (वय 72, रा. कोंढवा खुर्द) हे गुरुवारी (दि. 2) मारुती वाघमारे यांच्या रिक्षामधून मार्केटयार्ड येथून कोंढवा येथे त्यांच्या घरी निघाले होते. रिक्षामधून उतरताना स्वतःजवळ असलेली पाच लाखांची रोकड असलेली पिशवी ते रिक्षामध्ये विसरले. करमचंदानी यांना सोडून वाघमारे हे रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी पंपावर गेले असता त्यांना मागील सीटवर एक पिशवी दिसली. त्यांनी पिशवीमध्ये काय आहे हे पहिले असता त्यामध्ये नोटांची बंडले आढळून आली.

वाघमारे यांनी त्वरित करमचंदानी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे पैशाची पिशवी सुपूर्द केली. दरम्यान, पैशाची पिशवी रिक्षात विसरल्याची तक्रार देण्यासाठी करमचंदानी कोंढवा पोलीस ठाण्यात आले असता, रिक्षाचालक वाघमारे हे पैशाची पिशवी परत करण्यासाठी घरी आले असल्याचा फोन करमचंदानी यांच्या घरून आला. कोंढवा पोलिसांनी वाघमारे यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.