Pune : कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार – डॉ. दीपक म्हैसेकर

Increase the number and availability of ambulances for Kovid patients - Dr. Deepak Mhaisekar

एमपीसी न्यूज – कोरोना साथीमुळे रुग्णांची वाढती संख्या व रुग्णवाहिकांची मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या व उपलब्धता वाढवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

PMPL व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस PMPL च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सह व्यवस्थापक अजय चारठणकर, सुनील बुरसे, अनंत वाघमारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे उपस्थित होते.

पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या नोंदणी झालेल्या शासकीय व खाजगी अशा एकूण 2342 रुग्णवाहिका आहेत. सध्या कोविड रुग्ण वाढत असून रुग्णवाहिकेची वाढती मागणी लक्षात घेऊन रुग्णवाहिका वाढवण्यात येणार आहेत.

त्यासाठी PMPL कडे असणाऱ्या मिडी बस या रुग्ण वाहिकेत आवश्यकतेनुसार रूपांतरित करण्याच्या शक्यता पडताळून पहाव्यात, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

या सर्व रुग्णवाहिकांना GPS प्रणाली बसवण्यात येणार असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वॉर्डनिहाय परिसरात या रुग्णवाहिका थांबवण्यात येतील.

रुग्णांना नेण्यासाठी जवळची रुग्णवाहिका व जवळच्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता डॅशबोर्डमुळे त्वरित समजून येईल व रुग्णाला तातडीने दाखल करणे सोयीचे होणार आहे.

रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून रुग्ण व मृतदेह हाताळताना पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज अनिवार्य राहील . कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असतील, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

PMPL कडे असणाऱ्या मिडी बसमध्ये सुधारणा करून त्या रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभागाबरोबर समन्वय ठेवला जाईल, असे PMPL च्या गुंडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.