Pune : प्रतिबंधीत क्षेत्राचा नियमित आढावा घेण्यासह कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढवा : शरद पवार

Increase the number of corona tests with regular inspections of restricted areas review : Sharad Pawar

एमपीसी न्यूज – इंडियन कौन्‍सील ऑफ मेडीकल रिसर्चच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्या. प्रतिबंधीत क्षेत्राचा नियमित आढावा घ्‍या, खाजगी रुग्‍णालयातील कोरोनाच्‍या रुग्णांवरील उपचारांसाठी अवाजवी शुल्‍क आकारणी होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असेही पवार यांनी निक्षून सांगितले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत शरद पवार बोलत होते. कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने यावेळी प्रथमच त्यांनी बैठकीला हजेरी लावली. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधी – अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाने केलेले नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा आदीं बाबतची माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. सहव्याधी नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली.

पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्‍यांच्‍या-त्‍यांच्‍या महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, वॉर रुम व राबविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना आदींची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.