Pune Metro : वाकड – बालेवाडी दरम्यान उभारणार मेट्रो लाईन 3 चा 1000 वा सेगमेंट

एमपीसी न्यूज :  ‘पुणेरी मेट्रोया टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या पुणे मेट्रो लाईन 3 साठी एक हजाराव्या (1000) व्हायडक्ट सेगमेंटची निर्मिती आज मंगळवार, 17 जानेवारी ताथवडे येथील कास्टिंग यार्डमध्ये पूर्ण करण्यात आली. या सेगमेंटची पुढील काही दिवसांत मेट्रो लाईन (Pune Metro) 3 च्या नियोजित वाकड स्टेशन आणि बालेवाडी स्टेशन दरम्यान प्रत्यक्ष उभारणी करण्याचे नियोजन आहे. महत्वाची बाब म्हणजे, 22 जुलै 2022 रोजी पहिल्या सेगमेंटचे कास्टिंग झाल्यानंतर पुढील केवळ पाच महिन्यांच्या अवधीतच एक हजार सेगमेंट्सच्या निर्मितीचा टप्पा गाठण्यात विकसकांना यश आलेले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएमआरडीए) प्रणित पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचे काम एका शाश्वत वेगाने प्रगतीपथावर आहे. सेगमेंट कास्टिंगच्या वाढत्या संख्येमुळे या कामाला आणखी चालना मिळणार आहे.

“केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत एक हजार सेगमेंट्सचे कास्टिंग पूर्ण करणे, ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. पुणेरी मेट्रोच्या उभारणीसाठी आवश्यक सेगमेंटचे कास्टिंग ताथवडे येथील कास्टिंग यार्डमध्ये केले जात आहे. एक हजाराव्या सेगमेंटचे वजन सुमारे 37.54 टन आहे. मेट्रोच्या दर दोन खांबांच्या मध्ये असे साधारण 10 ते 12 सेगमेंट्स उपयोगात आणले जातात. एकीकडे पायलिंगचे कामही जोराने सुरू असताना; आमच्या कास्टिंग यार्डमध्ये वेगाने सेगमेंट्स तयार करून ठेवण्याचे काम सुरू आहे, ज्यांची मेट्रोच्या मार्गावर जेथे बाकी काम आधीच सुरू झाले आहे, तेथे उभारणी करण्यात येईल,” अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आलोक कपूर यांनी दिली.

Nigdi News : आता आपली सत्ता,  निर्णयासाठी कुणाकडेही जायची गरज नाही – शिवाजीराव आढळराव

सेगमेंट कास्टिंग म्हणजे काय?

सेगमेंट हा मेट्रो रेल्वे उभारणीच्या कामातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे; कारण तो रेल्वे ट्रॅकसाठी आधार म्हणून काम करतो. प्रत्येक सेगमेंट घडवित असताना तो एका विशेष समायोजक कास्टिंग मशीनमध्ये मागील विभागाच्या पुढे असा टाकला जातो. यामुळे दोन विभागांमधील इंटरफेस उभारल्यावर तो एकमेकांत तंतोतंत जुळला जाईल याची शाश्वती राहते. प्रत्येक सलग विभाग नंतर मागील एकाच्या पुढे टाकला जातो. सेगमेंट हा जणू एक प्रकारचा पूल असतो, जो लहान विभागात (तुकड्यात) बांधला जातो आणि अंतिम स्वरूपात नंतर ते जेथे वापरायचा आहे तेथे ठेवला जातो.

 

पुणे मेट्रो लाईन 3 बाबत माहिती

पुणे मेट्रो लाईन 3 हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा 23 किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे 35 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.