Pune News : आमदार मुक्ता टिळक यांचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

एमपीसी न्यूज :  आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होत्या. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कसबा मतदार संघात त्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्या आधी पुण्याच्या अडीच वर्ष महापौर होत्या.

मुक्ता टिळक यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात नगरसेवक या पदावरुन केली. त्या चार वेळा पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवक होत्या.भाजप संघटनेमध्ये त्यांनी विविध पदे भुषवली होती. दरम्यानच्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ऍम्ब्युलन्समध्ये जाऊन मतदान केले होते. त्यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेची मोठी चर्चा झाली होती.

मुक्ता टिळक या पुण्याच्या मुलीच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे काॅलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या मुक्ताताईंनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले. त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीए होत्या. आणि याशिवाय त्यांनी पत्रकारितेचा एक अभ्यासक्रमही पुरा केला आहे.

मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू श्रीकांत टिळक यांच्या सूनबाई आहेत. बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत. टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत्या.सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.

आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चार वेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर 2017 मध्ये त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. त्या महापौर असतानाच 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत.

मुक्ता टिळक यांचे आज दु 3.30 वा दुखःद निधन झाले. उद्या अंत्यदर्शनसाठी त्यांचे पार्थीव सकाळी 9 ते 11 या वेळेत केसरी वाडा या त्यांच्या राहत्याघरी ठेवण्यात येणार आहे.  त्यांचा अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे 11 नंतर करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.