Pune: खासदार गिरीश बापट यांनी मानधनाचे पाच लाख रुपये वाटले सर्वसामान्य पुणेकरांना!

Pune: MP Girish Bapat distributed his honorarium worth Rs 5 lakh to ordinary Punekars!

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अत्यंत हाल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांनी आपल्या मानधनाचे तब्बल 5 लाख रुपये या नागरिकांना वाटले.

हातावरच पोट असलेल्या व्यावसायिक, मजूर, रिक्षावाले, कुंभार समाजातील व्यावसायिक, विडी कामगार यांना 500 रुपये ते 2 हजार रुपये वाटण्यात आले. बापट यांच्या खासदारपदाच्या कार्यकाळाला आता वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांना महिन्याला 1 लाख 90 हजार मानधन मिळते. स्वीय सहाय्यक, कार्यालय आणि इतर खर्च होऊन वर्षभरात 5 लाख 32 हजार रुपये शिल्लक राहिले. यातील 5 लाख रुपये सर्वसामान्य पुणेकरांना वाटून टाकले, अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली.

गिरीश बापट अध्यक्ष असलेल्या ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून रोज सुमारे 600 लोकांसाठी अन्नछत्र चालविले जाते. पुणे महापालिकेने विविध शाळांत केलेल्या क्वारंटाईन नागरिकांना याचा लाभ होतो. अन्नधान्य आणि किराणा मालाचे 5 हजार किटही वाटप करण्यात आले आहेत. शहरातील जेष्ठ नागरिकांना घरपोच किराणा वाटप करण्यात येत आहे.

गिरीश बापट यांनी आपल्या मानधनातून 5 लाख रुपये सर्वसामान्य पुणेकरांना वाटप केल्याने इतर लोकप्रतिनिधी समोर आदर्श निर्माण केला आहे. समाजात राहत असताना त्याचे काही तरी देणे लागते, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून बापट यांचे काम सुरू आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामध्ये बापट यांची ही मदत महत्वपूर्ण मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.