Pune : महापालिकेत वर्दळ झाली कमी; गेटला लावले कुलूप

एमपीसी न्यूज – एरव्ही उठसूठ हजारोच्या संख्येने पुणे महापालिकेत गर्दी करणाऱ्या नागरिकांच्या संख्येला ‘कोरोना’मुळे ब्रेक लागला आहे. महापालिकेच्या गेटलाच कुलूप लावण्यात आल्याने गर्दीला अटकाव बसला आहे. सोबतच सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत.

पुणे शहरात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी नागरिकांना महापालिकेत येण्यास बंदी घातली आहे. महापालिका आणि क्षेत्रीय कार्यालयात रोज साधारण 30 हजार पुणेकर येत असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेत सर्वसामान्य पुणेकरांची वर्दळ कमी झाल्याने अधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भात अनेक उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याकडून सातत्याने कोरोनाचा रुग्णांची माहिती घेतली जात आहे.

कित्येकदा महापालिकेत वाहने लावायला जागाही मिळत नाही. काहीजण पुणे महापालिके समोरच वाहने लावतात. त्यामुळे नाईलाजाने वाहतूक पोलिसांना गाड्यांना जॅमर लावावे लागते. सध्या महापालिके समोरून या गाड्याच गायब झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.