Pune : पुणेकरांनी अनुभवल्या अरुण दाते यांच्या आठवणी आणि सुमधुर गीतांची स्वरगंगा

एमपीसी न्यूज- ‘या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’ ‘भेट तुझी माझी…’, ‘सखी शेजारीणी…’ , ‘डोळे कशासाठी…’, ‘जपून चाल, पोरी जपून चाल’ या गीतांनी पुणेकरांना गाण्यांमधील शुक्रता-याची स्वरानुभूती दिली. निमित्त होते पुण्यात नवा शुक्रतारा या अरुण दाते यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचे.

सुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते यांच्या ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…’ व ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्यांचे चित्रीकरण बीबीसीने सुमारे चाळीस वर्षांपूर्वी 29 जुलै, 1979 रोजी केले होते. ही दोन्ही गाणी बीबीसीने चित्रित केलेली आजपर्यंतची पहिली आणि शेवटची मराठी गाणी ठरली. याचेच औचित्य साधत पुण्यात नवा शुक्रतारा या अरुण दाते यांच्या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर सादर झालेल्या ‘श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा…’, ‘भेट तुझी माझी…’, ‘सखी शेजारीणी…’ , ‘डोळे कशासाठी…’, ‘जपून चाल, पोरी जपून चाल’ ‘दिस नकळत जाई’ अशा एकापेक्षा एक सुरेल गीतांनी पुणेकरांना गाण्यांमधील शुक्रता-याची स्वरानुभूती दिली. पावसाच्या संततधार सरींनी धुंद झालेले वातावरण आणि अरुण दातेंची सुमधुर गाणी यांनी उत्तरोत्तर रंगत गेलेली संध्याकाळ पुणेकर रसिकांनी काल अनुभवली.

गायक मंदार आपटे, श्रीरंग भावे, गायिका श्रुती जोशी यांनी यावेळी अरुण दाते यांची गाणी सादर केली. त्यांना प्रसन्न बाम (संवादिनी), झंकार कानडे (की – बोर्ड), अमित कुंटे (तबला), अमेय ठाकूरदेसाई (हॅण्डसॉनिक), प्रशांत कांबळे (ध्वनी व्यवस्था) यांनी साथसंगत केली. अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते यांनी अरुण दातेंच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री अनुश्री फडणीस हिने केलेल्या निवेदानालाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.