Pune : साहित्य संमेलनातील भाजपच्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज- यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील भाजपच्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ आज, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करावे, यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्यमंत्री मदन येरावार यांनी दबाव आणून संमेलनाच्या आर्थिक नाड्या आवळण्याची धमकीही दिली होती, असा खळबळजनक आरोप मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केला होता.

त्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनात होणाऱ्या भाजपच्या हस्तक्षेपाच्या विरोधात टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

चेतन तुपे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन साडेचार वर्षाचा कालावधी होऊन गेला. या साडेचार वर्षाचा काळात नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यांच्या अशा कारभारामुळे नागरिकांना जगणे मुश्किल झाले असून आता भाजपने साहित्य संमेलनात हस्तक्षेप केला आहे. ही दुर्दैवाची बाब असून लोकशाही धोक्यात आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. या कार्यक्रमाला नयनतारा सहगल यांना येऊ दिले नाही. ही निषेधार्थ बाब असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.