Pune News : लोकशाही मार्गाने अफगाणिस्तान पुन्हा उभारावा; डॉ.शेषाद्री चारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अफगाणी विद्यार्थ्यांशी संवाद

एमपीसी न्यूज – प्रत्येक देश हा आपापले हित जपत असतो व त्यानुसार आपल्या देशाचे धोरण ठरवतो. अफगाणिस्तानातील नागरिकांनी आपल्या देशाचे हित लक्षात घेत त्यानुसार लोकशाही मार्गाने आपला देश उभा करावा, असे मत आंतरराष्ट्रीय धोरण अभ्यासक डॉ. शेषाद्री चारी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अफगाणी विद्यार्थ्यांशी संवाद आणि ‘जिओ पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक इम्पॅक्ट ऑफ अफगाणिस्तान क्रायसिस’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्राध्यापक अरविंद कुमार, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, एअर मार्शल भूषण गोखले, अल्युमिनाय असोसिएशनचे संचालक संजय ढोले आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. शेषाद्री चारी म्हणाले, अमेरिकेने आतापर्यंत अनेक वेळा अफगाणिस्तानात सैन्य पाठवले व मागे घेतले. मात्र त्यांनी अफगाणी नागरिकांना स्वतःचं सरकार व स्वतःचे सैन्य स्थापन करण्यासाठी मी मदत करायला हवी होती ती झालेली दिसत नाही. यात अर्थातच अमेरिकेचे काही राजकीय व भौगोलिक हितसंबंध आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी जरी आता थांबवता येत नसल्या तरी त्यावर मात कशी करावी, यासाठी अभ्यास करून ध्येय धोरणे ठरवता येणे शक्य आहे.

प्रा. अरविंद कुमार म्हणाले, भारत आणि अफगाणिस्तानाचे चांगले संबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. तालिबानींना जर भारताशी संबंध टिकवायचे असतील तर त्यांना लोकशाही मार्गानेच काम करावे लागेल. तालिबान्यांना आवर घातला, तरच भविष्यात अफगाणिस्तानात लोकशाही प्रस्थापित होऊ शकेल.

सध्या पुण्यात जवळपास दोन हजार अफगाणी विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या व्हिसा संपणे, राहण्याची सोय नसणे तसेच काही आर्थिक अडचणी आहेत. त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सर्वोतोपरी मदत आम्ही करत आहोत.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.