Chinchwad News : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एक हजार पुस्तके दिली चिपळूणच्या वाचनालयास भेट

एमपीसी न्यूज – कोकणात अतिवृष्टीमुळे हजारो पुस्तकांचे नुकसान झाले. त्यासाठी चिपळूण मधील दोन वाचनालयांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते एक हजार पुस्तके प्रदान केली. वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी पुस्तके स्वीकारली.

कोकणात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. चिपळूण येथील 156 वर्षांची ऐतिहासिक वारसा असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या दोन्ही वाचनालयांतील 18 हजार पुस्तके वाहून गेली. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी एक हजार पुस्तके चिपळूणच्या वाचनालयास भेट दिली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा इतर भेटवस्तू ऐवजी पुस्तके द्यावीत, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी मला एक हजार पुस्तके भेट दिली. ती सर्व पुस्तके वाचनालयासाठी देत आहे. पुस्तके आपल्याकडून काहीही घेत नाहीत, ते आपल्याला देत असतात. त्यामुळे त्यांचे अनन्य साधारण महत्व आहे.

प्रकाश देशपांडे म्हणाले, या मदतीमुळे पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळाली आहे. या दोन्ही वाचनालयांमध्ये चारशे वर्षांपूर्वीच्या पोथ्या, 1805 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक अशी हजारो महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, पुस्तके गुरू असतात. त्यामुळे माणूस घडतो. पुस्तके हे पिढी घडवितात, समाजाला दिशा देतात. पुरग्रस्तांना मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे पुस्तकांची ही मदत देखील महत्वपूर्ण आहे.

आसावरी जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.