Pune News : सायकल योजनेचा फज्जा उडाल्यानंतर आता ई बाईक योजनेचा घाट !

एमपीसी न्यूज : कोट्यवधींचा चुराडा करणाऱ्या सायकल योजनेला बासनात गुंडाळल्यानंतर आता पालिकेने ‘ई-बाईक’ योजनेचा घाट घातला आहे. शहराच्या 500 ठिकाणांवर ई-बाईक उपलब्ध करून देत नागरिकांना प्रवासासाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना पुणे शहरात राबविणे शक्य असून ते फायदेशीर असल्याचा सकारात्मक अहवाल पालिकेच्या पथ विभागाने स्थायी समितीला दिला आहे.

काही वर्षांपूर्वी पर्यावरण पूरक वाहतुकीसाठी सायकल योजना सुरू केली. शहरामध्ये विविध ठिकाणी सायकल उभ्या करून या सायकलींना जीपीएस सिस्टीम बसवण्यात आली होती. जेणेकरून सायकल कोणत्या भागात वापरली जाते आहे याची माहिती मिळेल.

तसेच या सायकलींच्या वापरासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येत होते. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

परंतु, ही योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली. पुण्याच्या विविध भागांमध्ये लावलेल्या सायकली चोरीला गेल्या, तर काही भंगारात विकल्या गेल्या. काही सायकली निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामधून पालिकेला आर्थिक तोटा झाला नसला तरी फायदा देखील झाला नाही.

ही योजना फसल्यानंतर आता त्याच धर्तीवर ‘ई,- बाईक’ ही योजना आणली जात आहे. महापालिकेला यासंदर्भात एका एजन्सीने प्रस्ताव दिला असून या प्रस्तावावर काही नगरसेवकांच्या ‘सूचने’नुसार विभागाने विचार सुरू केला आहे.

ही योजना कितपत यशस्वी होऊ शकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. परंतु, पथ विभागाने मात्र पुणे शहरामध्ये ही योजना कार्यान्वित करण्यास हरकत नसल्याचे तसेच योजना यशस्वी होईल असा अभिप्राय स्थायी समितीला दिला आहे.

वास्तविक पुणे शहर हे दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरांमध्ये ३६ लाखांपेक्षा अधिक दुचाकी रस्त्यावर धावतात. शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता सर्वसामान्यांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे. परंतु, त्याकडे लक्ष न देता तकलादू योजना आणून पालिकेचा वेळ, पैसा आणि व्यवस्थांचा अपव्यव केला जात आहे.

या संदर्भात पथ विभागप्रमुख व्ही.जी.कुलकर्णी म्हणाले, पथ विभागाकडून ‘ई-बाइक’ संदर्भात सकारात्मक अभिप्राय स्थायी समितीला देण्यात आला आहे. ही योजना अद्याप प्राथमिक अवस्थेत असून त्याबाबतचा धोरणात्मक निर्णय अद्याप झालेला नाही. स्थायी समिती आणि मुख्य सभेमध्ये निर्णय होईल, त्यानुसार कार्यवाही केली जाईल. पथ विभागाने योजना राबविणे शक्य असल्याबाबत अभिप्राय दिला आहे.”

प्रकल्प विभाग प्रमुख श्रीनिवास बोनाला म्हणाले, “महापालिकेने यापूर्वी सायकल योजना राबविली होती. योजना राबविताना पालिकेला कोणताही खर्च करावा लागला नाही. सर्व खर्च एजन्सीने केला आहे. त्यामुळे पालिकेला आर्थिक नुकसान झाले नाही.”

– शहरातील 500 ठिकाणांवर ‘ई-बाईक’ उभ्या करण्याचे नियोजन.

– महत्वाचे रस्ते, चौक, आयटी पार्क, बाजार पेठा, मॉल्स, सिनेमागृहे आदी वर्दळीच्या ठिकाणी या बाईक उभ्या केल्या जाणार आहेत.

– बाईक पार्किंग एरियासह विविध ठिकाणी चार्जिंग पॉइंट उभारले जाणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.