pune news : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व टेस्टिंग सेंटर सातही दिवस सुरू ठेवा : विशाल तांबे

महापालिका आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व टेस्टिंग सेंटर सातही दिवस सुरू ठेवा, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि नगरसेवक विशाल तांबे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना यासंबंधीचे निवेदन सोमवारी देण्यात आले.

पुणे महापालिकेच्या वतीने १९ आरटीपीसीआर आणि २१ रॅपिड टेस्ट सेंटर पंधरा क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून चालवली जातात.

दर सात किंवा पंधरा दिवसांनी झोन प्रमाणे आठवड्यातील एक दिवस ही टेस्टिंग सेंटर बंद ठेवली जातात. निश्चितपणे तिथे काम करणार्‍या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा कामाचा ताण बघता सुट्टी देणे ही गरजेचे आणि क्रमप्राप्त आहे.

पण, शहरातील वाढणारी कोरोना ग्रस्तांची संख्या बघता ही सेंटर या काळामध्ये आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे अडचणीचे आहे.

म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा देखील विचार करून आणि पुणे शहरातील नागरिकांना करोनाच्या वाढत्या संसर्गातून मुक्त करण्यासाठी टेस्टिंगची गरज पाहता ही टेस्टिंग सेंटर सातही दिवस चालू ठेवणे गरजेचे आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्टीचा विचार करता त्या ठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था देखील प्रशासनाने उपलब्ध करावी. इथून पुढच्या काळामध्ये या सर्व टेस्टिंग सेंटरमधील टेस्टिंगची संख्या देखील वाढवावी, असेही विशाल तांबे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.