Pune News : राज्य सरकारकडून षडयंत्राद्वारे काँग्रेस मंत्र्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न : प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज : राज्य सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेेसच्या मंत्र्यांकडून षडयंत्राद्वारे काँग्रेस मंत्र्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा घणाघाती आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज (गुरुवारी) पुण्यात केला.

ते एका खासगी कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. दरेकर पुढे म्हणाले, काँग्रेस मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेेनेची ही मिलीभगत आहे. परंतु काँग्रेस पक्ष हे लपवत आहेत, त्यांच्यात हे सांगण्याचं धाडस नाही. ते सत्तेला चिकटून बसले आहेत त्यामुळं ही कोंडी ते सहन करतायत.

जर शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे एसटी महामंडळाचे वेतन व बोनस देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळवू शकतात. तर मग त्याच मंत्रीमंडळातील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना वीज बिलमाफीसाठी निधी दिला जात नाही. का नितीन राऊत यांना तोंडावर आपटायचाय की जनतेच्या मनात काँग्रेसबद्दल नाराजी निर्माण करायची आहे. त्यामुळं काँग्रेस मंत्र्यांना निधी न देता त्यांची कोंडी करण्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलीभगत असूून एक षडयंत्र आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

कारण कालच राज्य मंत्रीमंडळातील अन्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विदर्भात राज्य सरकारकडून काँग्रेस मंत्र्यांच्या मागणीला प्राधान्य का दिलं जात नाही, असा आरोप करीत नाराजी व्यक्त केली. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा पुनरुच्चार दरेकर यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.