Pune News : पुण्यात सार्वजनिक ठिकाणी छटपुजेवर बंदी !

एमपीसी न्यूज : पुण्यातील सार्वजनिक मोकळी मैदाने, नदीकिनारा, तलाव, कॅनॉल येथे छटपुजेला बंदी असणार आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

आदेशात नमूद केल्याप्रमाणे पुणे शहर आणि उपनगरातील सार्वजनिक मोकळी मैदाने, नदीकिनारा, तलाव, कॅनॉल येथे छटपुजेला बंदी असणार आहे. याठिकाणी भाविकांनी गर्दी न करता घरगुती पद्धतीने छटपुजेचा कार्यक्रम पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच छटपुजेच्या वेळी भाविकांनी सोशल डिस्टन्सिग, तोंडाला मास्क आणि हँड सॅनिटायजरचा वापर करत सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. गर्दी न करता छटपुजेचा सण साजरा करण्याचे बंधन आयोजकांवर असणार आहे.

त्या अनुषंगाने विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी छटपुजा साजरा करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

तसेच कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणे, गर्दी करणे आदी मार्गदर्शक सूचना व नियमांचा भंग करणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संबंधित दोषींविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. तसे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त कुमार यांनी प्रसिद्ध केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.