Pune News : दांडी बहाद्दर दोन आमदारांसह 27 नगरसेवकांना भाजपाची कारणे दाखवा नोटीस!

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या ऑनलाइन मुख्य सभेला गैरहजर राहणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या 27 नगरसेवकांना भारतीय जनता पक्षाने ‘गैरहजर का राहीले याचे कारणे दाखवा’ नोटीस बजाविली आहे. विशेष म्हणजे यादीत दोन विद्यमान आमदार नगरसेवकांचा देखील समावेश आहे.

महापालिकेची कर आकारणी विषयावर खास सभा तसेच पर्यावरणाची तहकूब सभा (गुरूवारी) 18 फेब्रुवारीला ऑनलाइन आयोजित केली होती. या सभेला उपस्थित राहावे यासाठी नगरसचिव कार्यालयामार्फत टपाला द्वारे कार्यपत्रिका पाठविण्यात आली होती. तसेच सभागृह नेता कार्यालयाच्या मार्फत प्रत्येक सभासदाला फोन करून सभेला उपस्थित राहावे, याबाबत सांगण्यात आले होते. मात्र इतके करून देखील या ऑनलाइन सभेला 27 सभासदांनी ‘दांडी ‘ मारल्याचे समोर आले आहे. वारंवार आठवण करूनही अनुपस्थित राहिलेल्या या सर्व सभासदांना नोटीस बजावित सभागृह नेता गणेश बीडकर यांनी खुलासा मागितला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट यांच्यासह सभागृह नेता कार्यालयाकडे हा खुलासा द्यावा, असे या नोटीस मध्ये नमूद केले आहे.

महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्याने पालिकेच्या सभागृहात पक्षाचे संख्याबळ 98 इतके आहे. ऑनलाइन सभेत जर एखाद्या प्रस्तावाला विरोध झाल्यास मतदानाच्या जोरावर हा प्रस्ताव मान्य व्हावा, यासाठी सर्व सदस्य उपस्थित राहावेत यासाठी तयारी केली गेली होती.

काही दिवसांपूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये देखील मार्गदर्शन करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सभागृहात हजर राहत नागरिकांच्या हितासाठी कसे प्रश्न उपस्थित करायचे, याचे मार्गदर्शन केले होते.

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने सभागृहात सर्वसाधारण सभा घेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे गेले वर्षभरापासून सर्वसाधारण सभा झालेल्या नाहीत. परिणामी 300 हून अधिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. अंतिम मान्यता न मिळाल्याने अनेक विकासाची कामे थांबली आहेत. ही बाब लक्षात घेत सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या नगरसेवकांचा याला विरोध असतानाही भाजपने ऑनलाइन सभा घेण्यास सुरुवात केली आहे. या सभेत प्रस्तावाला विरोध झाल्यास मतदान घेत बहुमताच्या जोरावर विषय मान्य करण्यास कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी वेळेवर सर्वसाधारण सभेसाठी हजर राहावे, अशा सूचना भाजपने आपल्या सभासदांना दिल्या होत्या.

या संदर्भात सभागृह नेता गणेश बीडकर म्हणाले, नागरिकांच्या दृष्टीने हिताचे निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे ही भाजपची शिस्त आहे. पालिका आयुक्तांनी मिळकत करात सुचविलेली वाढ फेटाळून पुणेकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी गुरुवारी खास सभा बोलाविण्यात आली होती. पक्षाच्या शिस्तीचे पालन न केलेल्या 27 सभासदांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून हजेरीसाठी प्रयत्न करूनही पदाधिकारीच गैरहजर !
सर्वसाधारण सभेला दांडी मारणाऱ्यांमध्ये पदाधिकारी, विविध महत्त्वाच्या समित्यांवर सदस्य, अध्यक्ष तसेच स्थायी समितीमध्ये काम करणारे आजी, माजी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील सर्वात अधिक सभासदांनी या सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.