Pune News : बिडी कामगारांना न्याय द्या ; बीडी मजदूर महासंघाच्या वतीने कामगार मंत्र्यांना निवेदन

एमपीसी न्यूज – बिडी कामगारांच्या विविध मागण्याबाबत अखिल भारतीय बीडी मजदूर महासंघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली. बीडी कामगाराना न्याय द्यावा अशी मागणी करत विविध मागण्याचे निवेदन यावेळी भुपेंद्र यादव यांना देण्यात आले. यावेळी कामगारांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन कामगार मंत्र्यानी दिले.

यावेळी अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे अध्यक्ष निवास कलाल, सरचिटणीस उमेश विस्वाद, भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय संघटन मंत्री बी सुरेंद्र व क्षेत्रीय संघटन मंत्री पवनकुमार उपस्थित होते.

या आहेत महासंघाच्या प्रमुख मागण्या

– बिडी कामगारांना पीएफ, ईएसआय सक्तीने लागू करावा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा.

– विविध राज्यातील किमान वेतन कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत.

– बिडी कामगारांच्या रोजगार संरक्षणासाठी बिडी उद्योगाला कोटपा (CIGARETTE AND OTHER TOBACCO PRODUCTS PREVENTION ACT ) कायद्यातून वगळण्यात यावे.

केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी कामगारांच्या विविध समस्यांचा आढावा घेऊन निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच, किमान वेतनबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.