Pune News : गुणरत्न सदावर्ते यांना पुणे पोलीसही अटक करण्याची शक्यता 

एमपीसी  न्यूज – वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांना आज सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान सदावर्ते यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. कारण पुणे पोलीसही आता सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. दीड वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. 
 

पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि बांधकाम व्यावसायिक अमर रामचंद्र पवार (वय 35) यांनी सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये सदावर्ते यांच्याविरोधात 9 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल आहे.

 

सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा एकेरी उल्लेख करून सकल मराठा समाजाचा अपमान होईल व जाती-पातीमध्ये तेढ निर्माण होऊन दंगल भडकेल अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलीसही या गुन्ह्यात सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.