Pune News: वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे गरजेचे – नंदन कुंद्यादी

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांच्या वतीने आयोजित  ‘विज्ञान आख्यान’ या  विज्ञान-नाटक विषयक कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेते विज्ञान चित्रपट दिग्दर्शक नंदन कुंद्यादी यांच्या हस्ते नुकतेच झाले.

विज्ञान भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव डॉ. मानसी माळगावकर, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संस्थापक मंदार नामजोशी तसेच  मुग्धा वाड आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान ही कार्यशाळा दररोज 4 ते 6 या वेळात होणार आहे. त्यात वैज्ञानिक शोधांचा प्रवास नाट्यातून मांडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेत अभिनय कौशल्य, विज्ञान कथा, नवीन तंत्रज्ञान यावर चर्चा करण्यात येणार आहे. विज्ञान नाटिकांचे लिखाण, दिग्दर्शन यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडक नाटिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. नऊ वर्षांपुढील वयोगटासाठी ही कार्यशाळा असून सुनील चौधरी, मंदार पटवर्धन, अश्विनी ओक हे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

नंदन कुंद्यादी म्हणाले की, समोर दिसणाऱ्या दृष्यापलीकडे पाहायला शिकवले पाहिजे. साचेबद्धपणे विचार करणे सोडले पाहिजे. निसर्गात विज्ञान आहे. त्यातून शिकत राहिले पाहिजे. नाटकाच्या माध्यमातून वैज्ञानिक शोधांचा प्रवास शोधण्याने विज्ञानाची अनुभूती घेणे शक्य आहे. त्यातून   गणित, शास्त्र शिकता येईल. विज्ञानाच्या पायाभूत गोष्टींकडे लक्ष देता येईल.

या कार्यशाळेत मुलांना केतकी गोडबोले (भरतमुनीचे नाट्यशास्त्र), मंदार परळीकर (सावरकर आणि विज्ञान), दिगपाल लांजेकर (छत्रपती शिवराय आणि विज्ञान) या विषयावरील मार्गदर्शन मिळणार आहे. रामानुजन यांच्यावर नंदन कुंद्यादी यांनी  केलेला राष्ट्रीय पुरस्कार विजेता माहितीपट  दाखवला जाणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर, उपाध्यक्ष धनंजय काळे, पराग गाडगीळ तसेच मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. च्या निर्मिती नामजोशी, समीर बापट, अवधूत गोडबोले आदी अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते. वैशाली लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्राची लांडगे यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.