IPL Cricket – लखनऊचा 18 धावांनी विजय,आयपीएलच्या इतिहासात मुंबईचा सलग सहावा पराभव

 (विवेक कुलकर्णी)

एमपीसी न्यूज –  आपल्या 100 व्या आयपीएल सामन्यात खेळत असलेल्या लखनऊ संघाच्या कर्णधार के एल राहुल ने प्रथम खेळताना आधी नाबाद शतक करत संघासाठी एक मोठी धावसंख्या उभारली, आणि नंतर प्रचंड दडपणाखाली असलेल्या मुंबई संघाच्या फलंदाजावर सतत दडपण ठेवताना कर्णधार म्हणूनही उत्तम कामगिरी केली, ज्यामुळे  नवख्या लखनऊ संघाने आपला आणखी एका विजय मिळवताना बलाढ्य मुंबई संघाला सलग सहाव्या पराभवाचा चटका देताना 18 धावांनी विजय मिळवला. अर्थातच के एल राहुल या सामन्याचा मानकरी ठरला.

आत्मसन्मान, प्रतिष्ठा सारे काही पणाला लागले असावे अशी परिस्थिती मुंबई इंडियन्स संघाची यावर्षच्या आयपीएलमध्ये आहे, ज्या रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे दाखले सर्वजण देत होते, तो मुंबई इंडियन्सचा महान कर्णधार रोहीत अजूनही यास्पर्धेत एकही विजय मिळवू शकला नव्हता,साहजिकच मुंबई इंडियन्स संघ कधी नव्हे तो प्रचंड दडपणाखाली दिसत होता, त्यातच आज नाणेफेकीचा कौल रोहीतच्या बाजूने लागला खरा,पण त्याने फलंदाजी न घेता गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो लखनऊ सुपर जायंट्स संघाने बऱ्यापैकी चुकीचा ठरवत आपल्या 20 षटकात कर्णधार राहुलच्या एका अविस्मरणीय शतकी खेळीच्या जोरावर आधीच दडपणात असलेल्या मुंबई संघापुढे विजयासाठी 120 चेंडूत 200 धावांचे तगडे आव्हानही ठेवले.

डीकॉक आणि के एल ने पहिल्या गड्यासाठी 33 चेंडूत तब्बल 52 धावांची वेगवान सलामी देत चांगली सुरुवात केली, डीकॉक चांगले खेळत आहे, असे वाटत असतानाच तो 13 चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 24 धावा करून ऍलनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पण याने लखनऊ संघाला काहीही फरक पडला नाही असे वाटण्यासारखे खेळायला सुरुवात केली, ती  कर्णधार राहूल आणि मनिष पांडे यांनी,या  दोघांनी आक्रमक आणि आकर्षक खेळतं दुसऱ्या गड्यासाठी आणखी एक अर्धशतकी भागीदारी करुन मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला छळ छळ छळले, त्यातूनच मुंबईचे क्षेत्ररक्षणही आज अतिशय खराब झाले, 39 चेंडूत 72 धावांची भागीदारी केल्यानंतर मनीष पांडे वैयक्तिक 38 धावांवर मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला,पण यानंतर के एल राहुलने जबरदस्त फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाना सळो की पळो करून सोडले. त्याला स्टोयनिस आणि दीपक हुडाने पण चांगली साथ दिली, राहुलने आपल्या 100 व्या आयपीएल सामन्यात तिसरे शतक करून हा सामना अविस्मरणीय करून दाखवला, त्याने फक्त 60 चेंडूत 9 चौकार आणि पाच षटकार मारत नाबाद 103 धावा करून डावाच्या शेवटपर्यंत नाबाद राहण्याचा पराक्रमही करून दाखवला. मुंबई इंडियन्सचे गोलंदाज त्याला अंकुश लावूच शकले नाहीत, ज्यामुळे लखनऊ संघाने आपल्या 20 षटकात 199 धावांची मोठी मजल मारली, जयदेव उनाडकटने दोन तर मुरगन अश्विन आणि एलनने एकेक गडी बाद केला.

आपल्या पहिल्या विजयासाठी 120 चेंडूत 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहितने, ईशान किशनसह मुंबईच्या डावाची सुरुवात केली.मात्र रोहीतचे अपयश आजही यशात बदलू शकले नाही, तो डावाच्या तिसऱ्याच षटकात फक्त 6 धावा काढून आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला,आणि मुंबई संघाला मोठा धक्का बसला.यातून सावरण्याचा प्रयत्न करताना डीवाल्ड ब्रेवीसने आक्रमकता दाखवत हल्लाबोल सुरू केला,पण त्याचे आक्रमन जास्त वेळ चालू शकले नाही,13 चेंडूत 6 चौकार आणि एक षटकार मारून त्याने वेगवान 31 धावा केल्या खऱ्या, पण आवेश खानने त्याला दीपक हुडाच्या हातून झेलबाद केले,आणि याच धावसंख्येवर ईशान किशनला तंबुत परतवून मार्कस स्टोयनिसने मुंबई संघाला तिसरा मोठा हादरा दिला.यावेळी मुंबई संघाची अवस्था 7 व्या षटकात 3 बाद 57 धावा अशी होती.यानंतर काही वेळ तरी सूर्यकुमार यादव  आणि तिलक वर्माने लढत थोडीफार आशा दाखवली खरी, पण त्यांना धावा हव्या त्या वेगात जमवता आल्या नाहीच,त्यामुळेच चेंडू कमी अन धावा जास्त असे समीकरण वाढतच राहिले.या दडपणाखाली धावा वाढवण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार 37 आणि तिलक वर्मा 26 धावा काढून बाद झाले,आणि मुंबई इंडियन्स पराभवाच्या संकटाच्या खाईत पुरते अडकले.शेवटच्या चार षटकात 66 धावा हव्या होत्या.

आता साऱ्या आशा केवळ आणि केवळ महाबली पोलार्डवरच होत्या.आजच्या हनुमान जयंतीच्या दिवशी त्याच्या अंगात त्या भीमरूपी म्हारुद्राने संचार करून मुंबईला जिंकून द्यावी अशी भाबडी अपेक्षा अनेक मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना होती.मात्र ही भाबडी आशा काही सत्यात उतरली नाही ,पोलार्ड लढला पण त्यात तो जुना जोश नव्हता, जगभर ओळख असलेला पोलार्ड नव्हता,25 धावा काढून तो चमीराच्या गोलंदाजीवर बाद झाला, आणि त्याबरोबरच शेवट झाला तो मुंबईच्या विजयाच्या अपेक्षांचा.त्यामुळेच मुंबई इंडियन्सला आणखी एका मानहानीकारक पराभवा ला सामोरे जावे लागले,

लखनऊ संघाकडून आवेश खानने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर होल्डर,चमीरा, बिष्णोई आणि स्टोयनिसने प्रत्येकी एक बळी मिळवत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांवरचे दडपण कायम ठेवत त्यांना विजयापासून दूर ठेवण्यात यशस्वी कामगिरी बजावली.

संक्षिप्त धावफलक
लखनऊ सुपर जायंट्स
4 बाद 199
के एल राहुल,नाबाद 103,पांडे 38,डीकॉक 26,स्टोयनिस 10,हुडा 15
उनाडकट 32/2, एम अश्विन 33/1,एलन 46/1
विजयी विरुद्ध
मुंबई इंडियन्स
20 षटकात 9 बाद 181
सूर्यकुमार 37,तिलक वर्मा 26,पोलार्ड 25,ब्रेविस 31
आवेश खान30 /3,होल्डर 34/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.