Hinjwadi News: दोन वर्षाच्या खंडानंतर अलोट गर्दीत वाकड, हिंजवडीत बगाड उत्साहात!

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीमुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा वाकड, हिंजवडीचे ग्रामदैवत आणि पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाचे पारंपारिक बगाड आज (शनिवारी)  उत्साहात पार पडले. बगाड मिरवणुकीत हजारो ग्रामस्थ आणि भाविक सहभागी झाले. पैस… पैस.. म्हातोबाच्या नावं चांगभलं, चांगभलं बोला चांगभलंच्या जय घोषाने अवघी आयटी नगरी दुमदुमली.

हिंजवडी गावठाणातील होळी पायथा मैदानापासून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बगाड मिरवणुकीस सुरूवात झाली. वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली. यावर्षी बगाडासाठी गळकरी होण्याचा मान हिंजवडीतील जांभूळकर घराण्याच्या वाड्यातील रामदास शिवाजी जांभुळकर यांना मिळाला. तर, संदेश साखरे आणि दीपक साखरे यांना खांदेकरी होण्याचा मान मिळाला.

कडाडणाऱ्या हलगीच्या नादात “पैस…पैस…,म्हातोबाच्या नावानं चांगभलं” च्या जयघोषात गळकऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात नेण्यात आले. तेथे मानाची कावड गेल्यानंतर गळकऱ्याच्या गळ्यात चाफ्याच्या फुलांची माळ घालण्यात आली. तेथे म्हातोबाचे दर्शन घेऊन खांदेकऱ्यांच्या सहाय्याने मारूती मंदिरात नेण्यात आले. हजारो भाविकांच्या गर्दीत खांदेकऱ्यांनी गळकऱ्याला होळी पायथा मैदानावर आणले. येथे हिंजवडी गावच्या वतीने सुतार समाजातील मानकऱ्याने गळकऱ्याला गळ टोचला.

गळ टोचलेल्या रामदास यांना रिंगण मैदानात नेऊन बगाडावर बसवून हजारो भाविकांच्या साक्षीने पाच गोल फेऱ्या मारण्यात आल्या. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आयटी अभियंत्यांसह ग्रामस्थ आणि नागरिकांचेही हात उंचावले होते. गळकऱ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविक आटापिटा करत होते. अनेकजण त्यासाठी उंच ठिकाणी गेले. पुढे ही मिरवणूक हिंजवडी, भूमकर वस्ती, केमसे वस्ती, वाकडकर वस्ती, भुजबळ वस्ती येथून मार्गस्थ झाली. वाकड गावठाणातील म्हातोबा मंदिरात मिरवणुकीची सांगता करून गळकऱ्याला मंदिरात नेण्यात आले.

दरम्यान, हनुमान जयंतीच्या म्हणजेच यात्रेच्या 10 दिवस आधी देव बसतात आणि वाकड-हिंजवडी ग्रामस्थांचा उपवास सुरू होतो. या 10 दिवसांत प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा होत नाही. बगाडाला नैवेद्य – बोण दाखवूनच उपवास सोडला जातो. हनुमान जयंतीला दुपारी 4 नंतर हिंजवडी गावाठाणातून वाकडच्या दिशेने बगाड मिरवणूक निघते,  मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातून भाविक वाकड हिंजवडीत जमतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.