Pune News : योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेची दोन्ही काँग्रेस व शिवसेनेने प्रशंसा करायला हवी – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – शिवसेनेने छत्रपती उदयनराजे भोसले यांना ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. कमीत कमी त्या पापाचे थोडेतरी प्रायश्चित्त करताना महाराजांच्या सन्मानार्थ दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेची प्रशंसा करायला हवी, असं मत कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

आग्र्यामध्ये मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. या संग्रहालयाचे नाव बदलण्यात येत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय. आग्रामधील संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेची दोन्ही काँग्रेस व शिवसेनेने प्रशंसा करायला हवी असं मत कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र सरकारच्याच काही घटक पक्षांनी मागच्या वर्षी छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असण्याचे पुरावे मागितले होते. कमीत कमी त्या पापाचे थोडेतरी प्रायश्चित्त करताना महाराजांच्या सन्मानार्थ दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने योगी जी यांच्या या घोषणेची प्रशंसा करायला हवी. ‘ असे ते म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेश सरकार हे स्वराज्याच्या विचारांनी प्रेरीत आहे. गुलामीच्या मानसिकतेचे प्रतीक असलेली चिन्ह सोडून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपले नायक मुघल असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले नायक आहेत, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर बांधण्यात हे संग्रहालय बांधण्यात येत आहे. सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.