Pune News : निर्बंध शिथिल करण्याची फक्त आश्वासने, कृती मात्र शून्य

एमपीसी न्यूज – कोरोना साथीचा जोर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ओसरला आहे. त्यामुळे दुकाने आणि हॉटेल्सवरील निर्बंध शिथिल होतील, अशी अपेक्षा दोन्ही शहरांमधील नागरिकांची होती. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी निर्बंध शिथिल होतील, अशी आश्वासनेही दिली. प्रत्यक्षात मात्र, सोमवारी रात्री निर्बंध कायम ठेवण्याचेच आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी काढले.

गेल्या आठवड्यात मेट्रो रेलच्या चाचणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रश्न विचारले. निर्बंध शिथिल करण्याबाबत विचार चालू असून मुख्यमंत्र्यांची भूमिकाही त्याबाबत सकारात्मक आहे. दोन दिवसांत त्याबाबत आदेश निघतील, असे उत्तर पवार यांनी दिले.

पवार यांच्या या विधानानंतर दुकाने, हॉटेलवरील निर्बंध उठणार अशा बातम्या प्रसारमाध्यमात झळकल्या. मात्र, त्यादृष्टीने शासकीय पातळीवर काहीच हालचाल झाली नाही. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही निर्बंध शिथिल होण्याबाबत दोन दिवसांत निर्णय होईल, अशी आश्वासने दिली. त्यानंतर दोन दिवसांत निर्बंध उठण्याऐवजी ते कायम ठेवले गेले आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरवासीयांची घोर निराशा झाली.

ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुणे जिल्हा लेव्हल 3 मध्ये टाकण्यात आला, असे शासकीय सूत्रांनी म्हटले आहे. जिल्ह्यात 1400 गावांपैकी 600 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत. त्यातही 31 गांवे पूर्णपणे कोरोनामुक्त आहेत, ही आकडेवारी शासकीय आहे. ग्रामीण भागातही काही गावे, तालुके कोरोनामुक्त असतानाही त्यांच्यावरही निर्बंध लावले आहेत. त्यामुळे तेथील रहिवासी नाराज आहेत. तालुक्यात निर्बंध लावताना शहर आणि जिल्हा असे स्वतंत्र युनिट धरून निर्णय घेतला जाईल, असे फक्त म्हटले गेले. मात्र, त्याबाबत राज्य सरकारची काहीच कार्यवाही दिसली नाही. नागरिकांच्या मनात असे अनेक प्रश्न असताना शहरांना वेठीला का धरले असा मुद्दा निर्माण झाला आहे.

पुण्यातील व्यापारी संघटना, हॉटेल-रेस्टॉरंट-बार मालकांच्या संघटना, कष्टकऱ्यांच्या संघटना या सगळ्यांनी निर्बंध शिथिल व्हावेत, अशी एकमुखी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केलेली आहे. टाळेबंदी आणि त्यापाठोपाठ निर्बंध यामुळे अनेक व्यवसाय मेटाकुटीला आले असून, रोजगार निर्मिती थांबली आहे. निर्बंध चालूच राहिल्यास व्यवसाय अधिक धोक्यात येतील आणि रोजगार पूर्णपणे बुडेल, अशी भीती पुणेकरांमध्ये आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.