Pune News : वंचितांसाठी ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद; 1300 जणांची लसीकरणासाठी नोंदणी

एमपीसीन्यूज : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेल्या लसीकरणाच्या संकल्पाला उदंड प्रतिसाद मिळत असून, जवळपास 1300 जणांनी लसीकरणासाठी आपले नाव नोंदवून कुपन घेतले. या सर्वांचे 10 आणि 11 जून रोजी लसीकरण होणार आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हिटचिंतकांना हार, तुरे नको वंचितांसाठी लस आणि रिक्षावाले काकांसाठी सीएनजी कुपन भेट द्या, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला अनुसरून समाजातील दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद देत निधी दिला.

पाटील यांच्या संकल्पानुसार, आज 8 जून रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात लसीकरणासाठी नावनोंदणी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कोथरुड करांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आपले नाव नोंदवून कुपन घेतले. जवळपास 1300 जणांनी या उपक्रमाअंतर्गत कोविन अॅपच्या माध्यमातून आपले नाव नोंदवले. आज नाव नोंदवलेल्या सर्वांचे 10 आणि 11 जून रोजी लसीकरण होणार आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालकांनाही मदतीचा एक हात देण्याचा संकल्प चंद्रकांत पाटील यांनी केला असून, रिक्षाचालकांना 1000 रुपयांचे सीएनजीचे कुपन दिले जाणार आहेत. यासाठी उद्या 9  तारखेला रिक्षाचालकांनी आपले लायसन्स, परमिट आणि आधारकार्डची छायांकित प्रत घेऊन आ. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.