Pune News: रतन टाटांनी विचारलं, हे हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच का? गडकरी म्हणाले..

एमपीसी न्यूज – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फक्त हिंदूंसाठी नाही, मुळात संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही, असं मला खुद्द रतन टाटांना समजावून सांगावं लागलं होतं’, अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात बोलताना सांगितली. हे सगळ मला त्यांना औरंगाबादच्या एका हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी सांगावं लागलं होतं, असं स्पष्टीकरण देखील गडकरी यांनी दिलं आहे.

नितीन गडकरी हे महाराष्ट्रात मंत्री असताना औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेडगेवार हॉस्पिटलचे उद्घाटन आयोजित केले होते. त्याच वेळी मुकुंदराव पणशीकर नावाचे गृहस्थ संघाचे प्रचारक होते. त्यांनी गडकरी यांच्याजवळ आग्रह धरला की, या हॉस्पिटलचे उद्घाटन हे रतन टाटा यांच्या हस्ते करायचं आहे.

त्यांच्या सांगण्यावरून नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिलं. नितीन गडकरी यांच्या आग्रहास्तव रतन टाटा हे स्वतः औरंगाबादला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले . पण विमानातून उतरताच रतन टाटा यांनी नितीन गडकरी यांना ‘ये हॉस्पिटल केवल हिंदू समाज के लिये है क्या?’ असा प्रश्न विचारला.

त्यावर गडकरी यांनी तुम्हाला असं का वाटतं विचारलं असता, रतन टाटा म्हणाले की, हे संघाचे हॉस्पिटल आहे म्हणून विचारलं. पण गडकरी यांनी असं नाही, असं सांगत हे पूर्ण समाजासाठी असल्याचं सांगत संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही, असे स्पष्टीकरण दिलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.