शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Pune News : कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांचे हेलपाटे थांबणार ; 22 फेब्रुवारीला वारसा नोकरीचा अंतिम निर्णय

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीत स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंतच्या सेवा देताना 46 कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आर्थिक मदत आणि वारसांना नोकरीत सामावण्यासाठी अक्षरश: हेलपाटे मारावे लागत होते. येत्या 22 फेब्रुवारीला मदत आणि नोकरी देण्यावर अंतिम निर्णय होणार असल्याने त्यांची पायपीट थांबणार आहे.

कायमस्वरुपी तत्वावर कार्यरत असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना महापालिकेकडून 50 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, ही घोषणा पूर्ण होऊ शकली नाही. मृतांचे नातेवाईक मदतीसाठी पदाधिकारी आणि अधिका-यांचे उंबरे झिजवत होते.

महापालिकेच्या 46 कर्मचाऱ्यांना या काळात प्राण गमवावा लागला. यातील 44 जण पालिकेचे कायम कर्मचारी होते. तर, दोन कंत्राटी कर्मचारी होते. यामध्ये परिचारिका, डॉक्टर, अभियंते, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, विविध विभागात काम करणारे अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.

केंद्र शासनाने सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन लागू केलेले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पालिकेने सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता.

पालिकेकडून 50 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच राज्य सरकारकडूनही 50 लाख देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाकडूनही अद्याप याबाबत काहीही कळविण्यात आलेले नाही. मृतांच्या नातेवाईकांना पालिकेने 50 लाख रुपये किंवा 25 लाख आणि पालिकेत नोकरी देण्यात येणार होती.

नुकतेच स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सप्टेंबरनंतरही कोरोनाशी दोन हात करताना मृत्यू झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज बुधवारी (दि.17) ऑनलाइन मुख्य सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय गटनेत्यांन चर्चा केली. त्यावर येत्या 22 फेब्रुवारी रोजी खास सभेत आर्थिक मदतीचे धनादेश आणि वारसांना नोकरी देण्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

spot_img
Latest news
Related news