Pune News: पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रचारात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार

शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांची माहिती

एमपीसी न्यूज – आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक शिवसेना मोठ्या ताकदीनिशी लढणार आहे. युवा सेनाप्रमुख, पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महापालिका निवडणूक लढविणार आहे. आदित्य यांनीही  जास्तीत-जास्त सभा घेण्याची ग्वाही दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणून महाविकासआघाडीची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्या समवेत गुरुवारी रात्री सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सविस्तर चर्चा झाली. शिवसेना उपनेते, प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, माजी मंत्री पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय संघटक,  श्री क्षेत्र भगवानगड गडाचे सचिव गोविंद घोळवे उपस्थित होते.

घोळवे म्हणाले, अत्यंत, संयमी, शांत नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रातील युवक वर्ग ओळखतो. विरोधाला विरोध कधीही करत नाहीत. विकास हाच सर्वांगीण ध्यास हाच त्यांचा अजेंडा आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसाला ताठ मानेने जगायला शिकविले. महाराष्ट्र जगला तर देश जगेल हा मूलमंत्र बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दिला होता. तोच वारसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत आहेत. कोरोना काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तम काम केले. धारावीसारखी झोपडपट्टी कोरोनाच्या विळख्यातून वाचविली. जागतिक आरोग्य संघटनेने मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत जास्तीत-जास्त नगरसेवक निवडणून येऊन महाविकासआघाडीची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीचे संकेत दिले आहेत. आघाडीबाबत मुख्यंमत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील. भाजपने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार हाच भाजपचा ध्यास आहे. भाजपला भुलभुलैय्या पार्टी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे  पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिवसेनेला मोठ्या प्रमाणात यश मिळेल असा विश्वास  गोविंद घोळवे यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी सचिन अहिर यांची नियुक्ती झाल्यापासून शिवसेनेच्या कार्यकर्ते, नेतेमंडळी मध्ये मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झाले.  प्रत्येक कार्यकर्ता महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांचे कार्य आज महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात आणि घरात पोचले आहे.

लवकरच दोन्ही महानगरपालिके संदर्भात कोर कमिटीची देखील निवड करण्यात येणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे शिवसेना देखील सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्य पुणे जिल्हा आणि दोन्ही महापालिका क्षेत्रात आहे. तसेच कार्य शिवसेनेचे मुंबई महापालिका क्षेत्रात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी दिली. शेवटी अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  घेतील. युवा वर्गामध्ये आदित्य ठाकरे यांची खूप मोठी क्रेझ आहे. त्यामुळे शिवसेनेकडे सर्वाधिक लोकप्रिय असं नेतृत्व  आदित्य ठाकरे  आहेत. त्यामुळे  महापालिका निवडणुकीत या वेळी युवावर्ग शिवसेना पक्षाला प्रथम पसंती देतील असा विश्वास देखील घोळवे यांनी व्यक्त केला. यावेळी उपनेते सचिन अहिर यांनी दोन्ही महापालिकेसंदर्भात आदित्य ठाकरे यांच्यासमवेत प्रदीर्घ चर्चा केली असून लवकरच शिवसेना निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना संपर्कप्रमुख माजी मंत्री सचिन अहिर म्हणाले,  दोन्ही महानगरपालिकेत सर्वाधिक जास्त नगरसेवक निवडून येणार आहेत. लवकर आदित्य ठाकरे साहेब पुणे आणि पिंपरी-चिंचवड संदर्भात बैठक देखील घेण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.