Pune: दिलासादायक! शहरात आज कोरोना मृत्यू ‘नीरंक’, 18 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज!

नवे 42 रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 586 वर

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित मृतांचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अखेर आज पुण्यात दिलासादायक बातमी मिळाली. शहरात आज कोरोनाबाधित मृताची एकही नोंद झालेली नाही.  मात्र नवीन 42 रुग्णांच्या कोरोना चाचणीचे अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आल्याने शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 586 झाली आहे. दरम्यान, पुणे शहरातील १८ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.  

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना पुणे शहरातील १८ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. सर्वांवर महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. सर्वांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टर्स आणि टीमचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. आतापर्यंत पुण्यात एकूण 55 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी 47 जणांवर डॉ. नायडू रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. केईएम रुग्णालयातून तीन जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. या व्यतिरिक्त सह्याद्री हॉस्पिटल (नगर रोड), भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जहांगीर रुग्णालय व ससून रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या प्रत्येकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिका रुग्णालयातील 453 आणि ससून रुग्णालयातील 133 अशी मिळून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 586 पर्यंत पोहचली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 396 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात एकूण 15 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. डॉ. नायडू रुग्णालयात 71 रुग्ण, सिम्बायोसिस सेंटर येथे 127 रुग्ण, भारती रुग्णालयात 76 रुग्णांवर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात 15 रुग्ण, रुबी हॉल क्लिनिकमध्ये 18 रुग्ण, केईएम रुग्णालयात 15 रुग्ण, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 14 रुग्ण, रक्षकनगर रुग्णालयात 13 रुग्णांवर तर इतर रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

परदेशातून शहरात आलेल्या एकूण 5 हजार 662 प्रवाशांपैकी 2 हजार 988 प्रवाशांनी 14 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असून अजूनही 2 हजार 674 प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

पुण्यात आतापर्यंत 50 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 41 जणांचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला आहे. औंध जिल्हा रुग्णालयात एक, नायडू रुग्णालयात एक, नोबेल रुग्णालयात दोन तर  इनामदार रुग्णालय, जहांगीर रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय (कर्वे रोड), पूना हॉस्पिटल व केईएम रुग्णालयात एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.