Pune : पंडित दीनदयाळ उपाध्याय विमा योजनेची व्याप्ती वाढली : डॉ. रामचंद्र हंकारे

Increase in expansion of Pandit Deendayal Upadhyay insurance scheme : Dr. Ramchandra Hankare

एमपीसी न्यूज – पंडित दीनदयाळ उपाध्याय विमा योजनेची व्याप्ती 2020 – 21 मध्ये या वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. मिळकत धारकांवर अवलंबून असलेल्या दिव्यांग बालक, घटस्फोटित मुलगी किंवा अविवाहित मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यास मूळ विमा रकमेच्या 50 टक्के अर्थात अडीच लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेतर्फे नियमित मिळकतकर भरणाऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे, असे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

2018 – 19 या आर्थिक वर्षापासून अधिकाधिक मिळकतकर जमा होण्यासाठी मिळकतधारकाचा विमा उतरविण्यात येत आहे. यामध्ये थकबाकी नसलेल्या मिळकत धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

ही महत्वपूर्ण योजना तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती.

त्यावर विरोधी पक्षांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत टीकाही केली होती. मात्र, पुणेकरांसाठी ही महत्त्वाची योजना असल्याचे मोहोळ यांनी ठासून सांगितले.

पहिल्या वर्षी सुमारे 5 कोटी रुपये प्रीमियम भरल्यानंतर केवळ 10 मिळकत धारकांना याचा लाभ झाला.

मागील वर्षी या योजनेची व्याप्ती वाढवून मिळकत धारकाची पत्नी व दोन मुले यांनाही सुरक्षा कवच देण्यात आले.

मिळकत धारकाला अपघातानंतर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये किंवा कुटुंबातील व्यक्तीला अपघात झाल्यास जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत उपचार खर्च आणि रुग्णवाहिकेचा खर्च देण्याची तरतूद वाढविण्यात आली आहे.

पुणेकरांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.