Pune : शुक्रवारपासून पुण्यात ‘पॉटरी महोत्सव’

कलाप्रेमींना ‘पॉटरी’चे अनोखे नमुने बघण्याची संधी

एमपीसी न्यूज- ‘पॉटरी’ ही कला अत्यंत प्राचीन असून मानवाचे हे पहिले नाविन्यपूर्ण संशोधन समजले जाते. कलासक्त पुणेकरांना याच कलेतील अनोखे नमुने नामांकीत व ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतीतून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. ‘पुणे पॉटर्स मार्केट 2019’ हा खास ‘पॉटरीकले’चा महोत्सव पुण्यात शुक्रवार, 6 सप्टेंबर ते रविवार, 8 सप्टेंबर दरम्यान नगर रस्त्यावरील फिनिक्स मार्केट सिटी व शुक्रवार, 13 सप्टेंबर ते रविवार, 15 सप्टेंबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘आयजीए गॅलेरीया’ यांच्यावतीने आयोजित हा महोत्सव या दोन्ही ठिकाणी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे.

‘पॉटरीकले’चा इतिहास आणि परंपरा फार जुनी आहे. मात्र यातील कलाकार व अनोखे नमुने हे मात्र दुर्मिळ होत आहेत. त्यामुळेच या कलेच्या रसिकांबरोबर सर्वच कलाप्रेमींसाठी हा महोत्सव एक पर्वणी ठरणार आहे. वैविध्यपूर्ण माती कामाच्या, पॉटरीकामाच्या आकर्षक, रेखीव कलाकृती येथे जवळून बघता येणार आहेत. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या देशभरातील तज्ज्ञांशी बोलण्याची, त्यांची कलाकृती जवळून न्याहाळण्याची व त्या विषयीचे शंका निरसन करून घेण्याची तसेच कार्यशाळेद्वारा शिकण्याची संधीही पुणेकरांना यामुळे उपलब्ध होणार आहे.

या क्षेत्रात महत्वपूर्ण समजले जाणारे रुबी झुनझुनवाला, शालन डेरे, संदीप मंचेकर, खंजन दलाल, गौरी गांधी, शयोन्ती साळवी यांचा महोत्सवात सहभाग असणार आहे. त्यांच्या दुर्मिळ व वैविध्यपूर्ण कलाकृती येथे प्रदर्शित होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.