Pune : जिल्ह्यासह शहरातही पावसाचा कहर; 600 पेक्षा अधिक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यासह शहर आणि धरण क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने धरणातून आता मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्या पात्राबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने नागरिकांना ये-जा करणे मुश्किल झाले आहे. काहींच्या घरात पाणी शिरले आहे. सध्या या पावसाने जिल्ह्यासह शहरातही कहर केल्याचे आढळत आहे. यामुळे सुमारे 600 पेक्षा अधिक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

पुणे महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील माहितीनुसार, आतापर्यंत शहराच्या विविध भागातील ६२५ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था स्थानिक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर केली आहे. पाण्यामुळे बाधीत झालेल्या भागांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. पावसाची परिस्थिती बघता एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यास सांगण्यात आले आहे. हे पथक महापालिकेच्या मुख्यइमारतीत हे पथक तैनात राहणार आहे. गरजेच्या ठिकाणी हे पथक तत्काळ पाठविण्यात येणार आहे.

  • ठिकाणे आणि स्थलांतरीत केलेल्या कुटुंबाची माहिती :
    १) आदर्शनगर, बोपोडी- २६० कुटुंब – राजेंद्र प्रसाद शाळा,
    २) शांती नगर येरवडा – ३०० कुटुंब- परुळेकर शाळा,
    ३) कामगार पुतळा – १३ नागरिक- दहा नंबर शाळा,
    ४) पाटील इस्टेट – पाच कुटुंब – घोले रस्ता पीएमसी काॅलनी शाळा शिवाजीनगर,
    ५) खिलारे वस्ती- ५० कुटुंब – उपाध्याय शाळा.

तर,मुठा नदीत सकाळी ११ वाजता ३५ हजार क्युसेक्सने खडकवासला धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाणी नदीपात्राबाहेर आले आहे. दुपारी एकच्या दरम्यान एकतानगरी, द्वारकानगरी येथील रहिवाशांना धोक्याची सूचना देण्यात आली असून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थंलातर केले आहे. तर,दुपारी तीनच्या सुमारास खिलारेवस्ती येथील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

  • मुळशी आणि पवना धरणातून नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच सकाळी दहा वाजता २८ हजार क्सुसेक्सने विसर्ग सुरू आहे,असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे बोपोडी- आदर्श नगर, अयोध्या नगरीचा परिसर पाण्यामुळे बाधीत झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.