Pune : धर्मेंद्र आणि कुटुंबीयांविरोधात खासदार संजय काकडेंचा न्यायालयात दावा

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या लोणावळ्याजवळील 185 एकर जागेच्या विकसनाचा करार सामंजस्य करारानुसार मिळावा आणि सामंजस्य करारानुसार ठरल्याप्रमाणे हाॅटेल व बंगला यांचे बांधकाम सुरू व्हावे म्हणून खासदार संजय काकडे यांनी पुणे न्यायालयात धर्मेंद्र व त्यांच्या दोन्ही पत्नी प्रकाश व हेमा मालिनी, मुले सनी देओल, बॉबी, ईशा, आहना अशा सर्वांविरोधात दावा दाखल केला आहे. आता धर्मेंद्र व संपूर्ण कुटुंबीयांना येत्या 10 जानेवारीला पुणे न्यायालयात बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती संजयनाना काकडे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

लोणावळ्याजवळील औंढे खुर्द गावात अभिनेते धर्मेंद्र व त्यांच्या कुटुंबीयांची 210 एकर जागा आहे. यातील धर्मेंद्र यांचा बंगला व लगतची जागा सोडून 185 एकर जागा विकासासाठी खासदार संजय काकडे यांना देण्यात आली. त्यातील 100 एकर जागेवर हॉटेल व उर्वरित जागेवर बंगले बांधले जातील. यात होणाऱ्या नफ्यात 70 टक्के वाटा खासदार काकडे यांचा व 30 टक्के धर्मेंद्र यांचा राहणार होता. जागेचा विकास खासदार संजय काकडे यांनी करायचा होता. धर्मेंद्र व त्यांचे कुटुंबीय आणि खासदार संजय काकडे यांच्यात मे 2018 मध्ये सांमजस्य करार झाला. सामंजस्य करारानुसार विकासाचा करार होणे आवश्यक होते. परंतु, तो झाला नसल्यानेच आपण न्यायालयात गेल्याचे काकडे म्हणाले.

जागेच्या विकासाच्या करारासाठी धर्मेंद्र यांच्यासोबत आपल्या किमान 30 ते 35 बैठका झाल्या. तर, सनी देओलसोबत 8 ते 10 बैठका झाल्या. परंतु, प्रत्येक बैठकीत त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या गेल्या व मूळ विकासाच्या कराराबाबत टाळाटाळ करण्यात आली. आता शेवटची बैठक तीन महिन्यांपूर्वी धर्मेंद्र यांच्या वकिलांसोबत झाली. त्यामध्येही सामंजस्य करारानुसार ठरल्याप्रमाणे पुढे जाण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यानंतरही काहीच झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव विकासाचा करार सामंजस्य करारानुसार व्हावा व काम सुरू व्हावे म्हणून न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायदेवतेकडे नक्की न्याय मिळेल, असेही काकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.