Pune : श्री गणाधीश रथातून दुपारी चार वाजता निघणार ‘दगडूशेठ’ गणपती विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Pune) , सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला गुरुवारी (दि.28) निघणार आहे. यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

PCMC :  सोसायटीधारकांच्या तक्रारींसाठी ‘सारथी’वर स्वतंत्र ॲक्सेस‘

श्री गणाधीश रथावर 8 खांब साकारण्यात आले आहे. प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हाहून निघणार आहेत. भगवान शंकरांच्या ८ गणांच्या मूर्ती रथावर असणार आहेत. त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 21 फूट इतकी आहे. रथावर १ मुख्य कळस बसविण्यात आला आहे. तसेच त्याच्या भोवती इतर असे मिळून पाच कळस असणार आहेत. आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आले आहे.

सांगता मिरवणुकीबाबत माहिती देताना माणिक चव्हाण म्हणाले, मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जाणार आहे. याखेरीज मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा असेल. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.