Pune : केरळ पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वेकडून 7 लाख लिटर पिण्याचे पाणी

मध्य रेल्वेची विशेष गाडी आज दुपारी होणार रवाना

एमपीसी न्यूज- केरळमधील पूरग्रस्तांसाठी भारताच्या सर्व भागातून मदतीचा हात दिला जात आहे. आता रेल्वेने देखील आपले कर्तव्य बजावत केरळ पूरग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचे 29 टँकर असलेली विशेष रेल्वे रवाना करणार आहे. ही गाडी आज दुपारी दोनच्या सुमारास केरळच्या कयमकुलम जंक्शनकडे रवाना होणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

केरळमध्ये सध्या पुराने थैमान घातले असून शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. पूरग्रस्त केरळमधील मदत आणि बचावकार्याला वेग आला असून, तिन्ही सेना दले आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहेत. या मदतीचा एक भाग म्हणून केरळ आपत्तीग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याची ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.

रतलाम रेल्वेस्थानकांमधून पिण्याच्या पाण्याचे 15 टँकर असलेली विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली असून ही गाडी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकात दाखल होणार आहे. या गाडीला पुण्यातून आणखी 14 पाण्याचे टँकर जोडून एकूण 29 टँकरची गाडी आज दुपारी केरळच्या कयमकुलम जंक्शनकडे रवाना होणार आहे.

शुक्रवारी (दि. 17) रात्रीपासून मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून घोरपडी रेल्वे स्थानकाच्या कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये टँकर भरण्याचे काम सुरु केले आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यासाठी पुणे अग्निशामक दलाकडूनही पाणी मागविण्यात आले असून एका टँकरमध्ये 50 हजार लिटर याप्रमाणे 7 लाख लिटर पाणी पुण्यातून पाठविले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.